ताजमहाल देशद्रोह्यांनी बांधला: भाजप आमदार

Sangeet Som
Sangeet Som

मीरत : भाजपचे आमदार संगीत सोम यांनी आज ताजमहालच्या इतिहासातील स्थानाबद्दल शंका उपस्थित करत नवा वाद निर्माण केला आहे. बाबर, अकबर आणि औरंगजेब हे "देशद्रोही' असून, त्यांची नावे इतिहासातून काढून टाकावीत, अशी अजब मागणीही त्यांनी केली आहे.

संगीत सोम हे मीरत जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, त्यांनी येथील सिसोली गावात आठव्या शतकातील राजा अनंगपालसिंग तोमर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. या वेळी झालेल्या सभेत बोलताना सोम यांनी इतिहासाचीही थोडी मोडतोड केली. ते म्हणाले, ""हा कसला इतिहास आहे? या इतिहासात ताजमहाल बांधलेल्या सम्राटाने आपल्या वडिलांना तुरुंगात डांबले. त्याने उत्तर प्रदेश आणि हिंदुस्तानमधील हिंदूंवर अत्याचार केले. भारतावरील आक्रमकांचे इतिहासात फारच उदात्तीकरण झाले आहे.'' वास्तविक, ताजमहाल बांधलेल्या शाहजहानलाच त्याचा मुलगा औरंगजेबाने अखेरपर्यंत तुरुंगात डांबल्याचा इतिहास आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्य सरकारच्या पर्यटनस्थळांच्या यादीतून ताजमहालचे नाव काढून टाकल्याचे वृत्त असून, त्या पार्श्‍वभूमीवर संगीत सोम यांचे आजचे विधान होते. ताजमहालचे नाव यादीतून काढून टाकल्यामुळे अनेकांना दुःख झाल्याचेही सोम म्हणाले.

प्रताप आणि छत्रपती शिवाजी यांच्यासारख्या खरोखरीच्या युगपुरुषांचे चरित्र आणि त्यांचे कार्य शाळा-महाविद्यालयांमध्ये शिकविण्याची गरज असल्याचे सोम म्हणाले. तसेच, अनेक शूरवीर हिंदू राजांना इतिहासामध्ये काहीही स्थान मिळालेले नाही, त्यांच्या शौर्य आणि त्यागाचा सन्मान व्हावा यासाठी भाजप सरकार प्रयत्न करेल, असेही ते म्हणाले. अयोध्येतील राममंदिर आणि मथुरेतील कृष्णमंदिर यांचे बांधकाम कोणीही थांबवू शकत नाही, असा दावाही सोम यांनी या वेळी केला. सोम यांच्या या विधानानंतर समाजवादी पक्ष आणि नॅशनल कॉन्फरन्स या पक्षांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारच्या पर्यटन पुस्तिकेतून ताजमहालचे नाव गायब झाल्यानंतर टीका झाल्यावर सरकारने पत्रक प्रसिद्ध करत सारवासारव केली आहे. राज्यात 370 कोटी रुपये पर्यटन प्रकल्पासाठी प्रस्तावित असून, यापैकी 156 कोटी रुपये एकट्या ताजमहाल आणि परिसराच्या विकासासाठी राखून ठेवले असल्याचे सरकारने म्हटले आहे.

लाल किल्लाही "देशद्रोह्यां'नीच बांधला आहे. मोदी येथून तिरंगा फडकाविणार नाहीत का? मोदी आणि योगी हे देशी-विदेशी पर्यटकांना "ताजमहाल पाहू नका' असे सांगणार का?
- असदुद्दीन ओवेसी, खासदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com