न्याय व्यवस्थेत तंत्रज्ञानाचा वापर करावा- पंतप्रधान मोदी

वृत्तसंस्था
रविवार, 2 एप्रिल 2017

आमच्या सरकारने पाच वर्षांच्या आतच 1200 कायदे रद्द केले, कायदे सोपे केले याचा मला आनंद आहे. नव्या भारताचे आणि नव्या पिढीचे स्वप्न साकार होईल अशी मला आशा आहे.

- पंतप्रधान नरेंद्र मोदी

अलाहाबाद : "तंत्रज्ञानाने न्याय व्यवस्था अधिक सक्षम बनेल, तसेच पैसा आणि वेळ वाचेल. तंत्रज्ञानाच्या साह्याने न्यायालयीन कामकाजदेखील सोपे करता येऊ शकेल," असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या 150 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. भारतातील सर्वांत मोठ्या बोगद्याचे उद्घाटन कार्यक्रमाला जाण्यापूर्वी मोदी येथे आले होते. 

मोदी म्हणाले, "कैद्यांना न्यायालयात घेऊन जाण्यापेक्षा आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग का वापरू शकत नाही. नाविन्यपूर्ण सेवा आणि अॅप्लिकेशन्स तयार करून त्या माध्यमातून स्टार्ट अप्स उद्योगांचादेखील न्याय व्यवस्थेला उपयोग होऊ शकतो."

ते पुढे म्हणाले, "आमच्या सरकारने पाच वर्षांच्या आतच 1200 कायदे रद्द केले, कायदे सोपे केले याचा मला आनंद आहे. नव्या भारताचे आणि नव्या पिढीचे स्वप्न साकार होईल अशी मला आशा आहे."

अलाहाबाद न्यायालयाची वैशिष्ट्ये
न्यायालयीन क्षमतेच्या दृष्टीने अलाहाबाद उच्च न्यायालय हे देशातील सर्वांत मोठे न्यायालय आहे. महिला वकिलांची भरती करणारे हे पहिले न्यायालय आहे. तसेच, आतापर्यंत व्ही.एन. खरे, के.एन. वाँचू, मिर्झा हमीदुल्ला बेग, रघुनंदन सरीन पाठक आणि कमल नारायण सिंह हे भारताचे पाच सरन्यायाधीश याच न्यायालयातून पुढे आलेले होते.