लोक काही मूर्ख नाहीत: तेजस्वी यादव

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 जुलै 2017

बिहारमध्ये दलित, ओबीसी आणि ईबीसी यांचा प्रभाव वाढत होता. तेव्हा जदयुला मदत करुन जुनी, जातीवर आधारित राजकीय व्यवस्था पुन्हा आणण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपने ही खेळी केली आहे. नितीशकुमार यांची सत्तेची हाव स्पष्ट आहे. मात्र लोक मूर्ख नाहीत

नवी दिल्ली - बिहारमधील राजकीय भूकंपाच्या केंद्रस्थानी असलेले तेजस्वी यादव यांनी नितीशकुमार यांना भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) मिळालेल्या पाठिंब्याच्या पार्श्‍वभूमीवर लोक मूर्ख नाहीत, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा असलेल्या लालुप्रसाद यादव यांचे पुत्र असलेले तेजस्वी हे याआधी बिहारचे उपमुख्यमंत्री होते. मात्र केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) त्यांच्याविरोधात एका गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरु केल्यानंतर राजद व नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलामधील संघर्ष वाढत गेला. या संघर्षाची परिणती नितीशकुमार यांनी राजीनामा देण्याची घोषणा करण्यामध्ये झाली. परंतु भाजपने पाठिंबा देऊन हे नितीशकुमार यांचे सरकार वाचविले आहे. या पार्श्‍वभूमीवर तेजस्वी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

"उपमुख्यमंत्री म्हणून मी करत असलेल्या कामगिरीमुळे भाजप व जदयु अस्वस्थ झाले होते. यामुळेच त्यांनी जदयु व राजदमधील युती तोडण्याचे कारस्थान रचले. बिहारमध्ये दलित, ओबीसी आणि ईबीसी यांचा प्रभाव वाढत होता. तेव्हा जदयुला मदत करुन जुनी, जातीवर आधारित राजकीय व्यवस्था पुन्हा आणण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपने ही खेळी केली आहे. नितीशकुमार यांची सत्तेची हाव स्पष्ट आहे. मात्र लोक मूर्ख नाहीत,'' अशी टीका तेजस्वी यांनी केली आहे.