दहशतवाद हे भेकडांचे शस्त्र : राजनाथसिंह

पीटीआय
शनिवार, 29 ऑक्टोबर 2016

शस्त्रसंधी उल्लंघनास आमचे लष्कर सडेतोड उत्तर देत आहे.
- राजनाथसिंह, गृहमंत्री

ग्रेटर नोएडा - पाकिस्तानने भारताविरोधात पुकारलेल्या छुप्या संघर्षाचा गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज कठोर शब्दांत समाचार घेत दहशतवाद हे भेकडांचे शस्त्र असल्याचे म्हटले आहे.

या शस्त्राचा आधार घेऊन पाकिस्तान भारताला क्षती पोचवू पाहत आहे, असेही त्यांनी नमूद केले. दहशतवादाच्या पाठीशी असणारे लोक भेकड असल्यानेच त्यांनी हा मार्ग निवडला असल्याचेही त्यांनी सांगितले. ते भारत-तिबेट सीमा पोलिसांच्या 55 व्या स्थापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये बोलत होते.

सीमवरील बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आल्याने चीनच्या लष्कराकडून होणाऱ्या घुसखोरीच्या घटनांमध्ये 60 टक्‍क्‍यांनी घट झाल्याचे त्यांनी नमूद केले. दहशतवादाच्या माध्यमातून भारताला अस्थिर करण्याचे कारस्थान पाकने आखले आहे. भारताची प्रगती पाकिस्तानच्या डोळ्यामध्ये खुपते आहे. आमचा देशही जगातील सर्वांत वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था असल्याचे त्यांनी नमूद केले. आम्ही आमच्या लष्कराला शत्रूवर, प्रथम गोळीबार करू नका, असे निर्देश दिले असून; पण जर शत्रूकडून गोळीबार झाला तर गोळ्या मोजत बसू नका, असे सांगितल्याचे राजनाथ यांनी नमूद केले.