काश्‍मीरमध्ये तीनशे दहशतवादी सक्रिय 

काश्‍मीरमध्ये तीनशे दहशतवादी सक्रिय 

श्रीनगर : जम्मू-काश्‍मीर खोऱ्यात सुमारे 300 दहशतवादी सक्रिय असून, अडीचशे दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत असल्याची माहिती लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, उद्यापासून काश्‍मीर खोऱ्यात स्थानिक स्वराज संस्थेसाठी निवडणुका होत असून चार टप्प्यात मतदान होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर खोऱ्यात बंदोबस्त वाढवला आहे. 

लष्कराच्या पंधराव्या कोअरचे जनरल ऑफिसर कमांडिंग लेप्टनंट जनरल ए. के. भट्ट यांनी पत्रकार परिषदेत दहशतवाद्यांची घुसखोरी हाणून पाडण्यासाठी जवानांना आणखी सजग राहण्याचे आदेश दिल्याचे सांगितले. सुरक्षा दल विशेषत: लष्कर, पोलिस, सीआरपीएफच्या जवानांची गस्त वाढविण्यात येत आहे. अडीचशेहून अधिक दहशतवादी भारतीय हद्दीत घुसण्याच्या तयारीत आहेत. मात्र आपले लष्कर आणि जवान त्यांना रोखण्यासाठी सज्ज आहेत.

कोणत्याही स्थितीत दहशतवादी भारतात घुसणार नाहीत, याची जवानांकडून पूर्ण काळजी घेण्यात येत आहे. याशिवाय काश्‍मीर खोऱ्यात विविध ठिकाणी तीनशेहून अधिक दहशतवादी सक्रिय आहेत, असेही त्यांनी नमूद केले. श्रीनगरबरोबर अन्य महत्त्वाच्या शहरांत वाहनांची कसून तपासणी केली जात असून, त्यासाठी श्‍वानपथकांची मदत घेतली जात आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी बंदोबस्त 

काश्‍मीर खोऱ्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 8 रोजी मतदान होत आहे. या पार्श्‍वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. सुरक्षा दलाने तपासणी आणि गस्तीत वाढ केली असून जेणेकरून नागरिक निर्भयतेने मतदान करू शकतील.

निवडणूक शांततेत व्हावी यासाठी पाचशेहून अधिक ओव्हर ग्राऊंड वर्कर (दहशतवाद्यांसाठी काम करणारे) संशयितांना ताब्यात घेतले आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान दहा ऑक्‍टोबरला तर तिसऱ्या टप्प्यासाठी 13 ऑक्‍टोबरला मतदान होणार आहे. शेवटचा टप्पा 16 ऑक्‍टोबर रोजी होत आहे. मतमोजणी 20 ऑक्‍टोबरला होणार आहे. या निवडणुकीवर नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीने या पक्षाने बहिष्कार घातला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com