यूपी, बिहार, झारखंडला वादळी पावसाचा तडाखा, विजा कोसळून 46 जणांचा मृत्यू 

वृत्तसंस्था
बुधवार, 30 मे 2018

केरळमध्ये दाखल झालेला मॉन्सून तमिळनाडूच्या दिशेने कूच करत असताना उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडला आज वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा बसला. विविध भागांमध्ये विजा कोसळून 46 जणांचा मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये सर्वाधिक म्हणजे 19 जण मरण पावले असून, उत्तर प्रदेशात 15; तर झारखंडमध्ये 12 जणांचा बळी गेला आहे. 

लखनौ - केरळमध्ये दाखल झालेला मॉन्सून तमिळनाडूच्या दिशेने कूच करत असताना उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडला आज वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा बसला. विविध भागांमध्ये विजा कोसळून 46 जणांचा मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये सर्वाधिक म्हणजे 19 जण मरण पावले असून, उत्तर प्रदेशात 15; तर झारखंडमध्ये 12 जणांचा बळी गेला आहे. 

उत्तर प्रदेशात आज संमिश्र वातावरण पाहायला मिळाले, पूर्वेकडील भागामध्ये पाऊस पडत असतानाच पश्‍चिमेकडे मात्र सूर्य आग ओकत होता. अलाहाबाद, मोरादाबाद, झाशी, गोरखपूर, वाराणसी आणि कानपूर या शहरांमधील तापमान सामान्य पातळीपेक्षा अधिक होते. ओराईमध्ये उष्णतेने 47 अंश सेल्सिअसचा पारा ओलांडला होता. पुढील दोन दिवसांमध्ये राज्याच्या अनेक भागांमध्ये ताशी 50 ते 70 किलोमीटर एवढ्या वेगाने वारे वाहू शकतात, असे हवामान खात्याने म्हटले आहे. बिहारमध्ये गया, मुंगेर, कटिहार, नवादा आणि औरंगाबाद या जिल्ह्यांनाही वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मृतांच्या नातेवाइकांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. 

Web Title: Thunderstorms lash Uttar Pradesh, Bihar, Jharkhand: 46 killed, over 30 injured