टिपू सुलतानला इंग्रजांशी लढताना वीरमरण: राष्ट्रपती

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

येत्या दहा नोव्हेंबरला कॉंग्रेस सरकारने टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. कॉंग्रेसच्या टिपू सुलतान जयंती कार्यक्रमास भाजपने आक्षेप घेतला आहे. त्यातच कर्नाटक विधानसभेच्या हीरक महोत्सवानिमित्त विधिमंडळाच्या संयुक्त अधिवेशनास मार्गदर्शन करताना राष्ट्रपती कोविंद यांनी टिपू सुलतानबाबत गौरवोद्‌गार काढले.

बंगळूर : टिपू सुलतान हा मोठा योद्धा होता. इंग्रजांशी लढता लढता त्याला वीरमरण प्राप्त झाले, या शब्दांत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्याचा आज गौरव केला. टिपू सुलतानच्या जयंतीवरून कर्नाटकात वाद सुरू असतानाच राष्ट्रपतींच्या या विधानामुळे कर्नाटक भाजप कोंडीत सापडले आहे. 

येत्या दहा नोव्हेंबरला कॉंग्रेस सरकारने टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. कॉंग्रेसच्या टिपू सुलतान जयंती कार्यक्रमास भाजपने आक्षेप घेतला आहे. त्यातच कर्नाटक विधानसभेच्या हीरक महोत्सवानिमित्त विधिमंडळाच्या संयुक्त अधिवेशनास मार्गदर्शन करताना राष्ट्रपती कोविंद यांनी टिपू सुलतानबाबत गौरवोद्‌गार काढले. म्हैसूरच्या विकासात टिपू सुलतानने मोठे योगदान दिले आहे. त्याच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाने तयार केलेल्या "म्हैसूर रॉकेट'चा वापर नंतर युरोपनेही केल्याचे कोविंद यांनी म्हटले आहे. आपल्या भाषणात राष्ट्रपती टिपू सुलतानचे दाखले देत असताना कॉंग्रेसचे आमदार त्याला बाके वाजवून दाद देत होते. राष्ट्रपती कोविंद यांच्या भाषणाबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ट्विट करून कौतुक केले आहे. 

दरम्यान, राज्य सरकारने राष्ट्रपती कार्यालयाला चुकीची माहिती देऊन कोविंद यांच्या तोंडी टिपू सुलतानबाबत उल्लेख घातल्याचा आरोप करत टिपू सुलतान हा धार्मिक भेद करणारा आणि खुनी होता, असे भाजपने म्हटले आहे. तर, हा आरोप लज्जास्पद असल्याचे कॉंग्रेसने म्हटले आहे. टिपू सुलतान हा "बलात्कारी' आणि "खुनी' असल्याचे विधान भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. हिंदू स्त्रियांची अब्रू लुटणाऱ्या व्यक्तीची जयंती साजरी करणे लज्जास्पद असल्याचे ट्विटही हेगडे यांनी केले होते.