खऱ्या भारतीयाला पाकचा राग यायला हवा - संजय राऊत

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 मार्च 2017

पाकिस्तानमध्ये गेलेले नुकतेच दोन धर्मगुरू भारतात परतले आहेत. या पार्श्‍वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी चिंता व्यक्त करत पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारचा व्यवहार ठेऊ नये, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. खऱ्या भारतीयाला पाकिस्तानचा राग यायला हवा, असेही ते म्हणाले.

मुंबई - पाकिस्तानच्या ताब्यातील दोन मुस्लिम धर्मगुरू नुकतेच भारतात परतलेले आहेत. या पार्श्‍वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी चिंता व्यक्त करत पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारचा व्यवहार ठेऊ नये, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. खऱ्या भारतीयाला पाकिस्तानचा राग यायला हवा, असेही ते म्हणाले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, 'मी नेहमी म्हणतो की आपण पाकिस्तानसोबत कोणत्याही प्रकारचे संबंध ठेऊ नयेत. त्यांचे कलाकार, त्यांची किक्रेट टीम आणि इतरांना भारतात येण्याची परवानगी देऊ नये. अगदी भारतीयांनीही तिकडे जाऊ नये. दोन्ही देशांचे संबंध कसे आहेत हे माहित असूनही ते तिकडे (पाकमध्ये) का गेले? जर तुम्ही खरे भारतीय असाल, तर तुम्हाला पाकिस्तानचा राग यायला हवा.'

सैयद असिफ निझामी आणि त्यांचा पुतण्या नझीम निझामी या दोघांना लाहोरमधील इकबाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 14 मार्चला ताब्यात घेतले होते. असिफ निझामी हे दिल्लीतील निझामी दर्ग्याचे प्रमुख धर्मगुरू आहेत. आपल्या बहिणीला भेटण्यासाठी ते पाकिस्तानला गेले होते. परंतु परतताना त्यांना अटक झाली. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने केलेल्या प्रयत्नामुळे ते पुन्हा भारतात परतले.