पाकच्या ISI चे दोन संशयित छत्तीसगढमधून ताब्यात

वृत्तसंस्था
रविवार, 16 एप्रिल 2017

छत्तीसगढ पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी आज (रविवार) 'ISI'साठी काम करणाऱ्या दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

बिलासपूर (छत्तीसगढ) - छत्तीसगढ पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर त्यांनी पाकिस्तानी गुप्तहेर संस्था 'ISI'साठी काम करणाऱ्या दोन संशयितांना आज (रविवार) ताब्यात घेतले आहे. 

छत्तीसगढमधील जंजिरा-चंपा येथील मनविंदर यादव आणि संजय देवांगण यांना ताब्यात घेतले आहे. देशविरोधी कारवायांच्या आरोपाखाली दहशतवादविरोधी पथकाने अलीकडेच जम्मू आणि मध्य प्रदेश येथून सतविंदर सिंग, रिझवान तिवारी आणि बलराम यांना ताब्यात घेतले होते. आज ताब्यात घेतलेले दोन संशयित या तिघांसाठी काम करत होते. त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'मनविंदर यादव आणि संजय देवांगण वेगवेगळ्या बॅंकेत खाते आहे. या खात्यांवरून ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवत होते. आम्हाला माहिती मिळाल्यानंतर तातडीने कारवाई करत आम्ही त्यांना ताब्यात घेतले आहे', अशी माहिती पोलिस अधीक्षक मयांक श्रीवास्तव यांनी दिली.

या दोघांच्या दूरध्वनीवरील संभाषणावर लक्ष ठेवून ते टॅप करून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीनंतर मनविंदरने रिझवान तिवारीसाठी काम करत असल्याचे कबूल केले. तिवारीच्या सूचनेवरूनच पैसे पाठविल्याचेही त्याने सांगितले.