पाकच्या गोळीबारात दोन भारतीय ठार 

पीटीआय
शनिवार, 13 मे 2017

दक्षिण काश्‍मीरमध्ये शंभराहून अधिक दहशतवादी कार्यरत असून, त्यात स्थानिकांचाही सहभाग असल्याचा दावा मेजर जनरल राजू यांनी केला आहे. लष्कर आणि जम्मू-काश्‍मीर पोलिसांनी संयुक्तरित्या मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम हाती घेतली आहे.

जम्मू-काश्‍मीर : पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत नौशेरा सेक्‍टरमध्ये केलेल्या गोळीबारात दोन भारतीय नागरिक ठार झाले, तर तिघे जण जखमी झाले आहेत.

जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गोळीबाराला लष्कराकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.

हुतात्मा जवानाच्या मृतदेहाची पाकने केलेल्या विटंबनेमुळे सीमेवरील तणाव वाढला असून, पाककडून गोळीबार सुरूच असल्याने परिसराच्या गावांमधील लोकांना घराबाहेर पडण्यास बंदी करण्यात आली आहे. सीमा भागातील किला दरहल, नौशेरा, मंजारकोट गावांतील शाळा अनिश्‍चित काळासाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच, गावकऱ्यांना सुरक्षितस्थळी हालविण्याचे कामही थांबविण्यात आले आहे.

जम्मूतील अर्नियातल्या आंतरराष्ट्रीय सीमेवरही पाकने गोळीबार करत येथे कुंपण घालण्याचे काम करणाऱ्या जवानांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. 

दरम्यान, दहशतवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या लेफ्टनंट उमर फय्याज यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन, उमर यांचे हौतात्म्य वाया जाऊ देणार नाही, असा दिलासा लष्करी अधिकारी मेजर जनरल बी. एस राजू यांनी त्यांना दिला. या वेळी त्यांनी उमर यांच्या कुटुंबीयांकडे 75 लाख रुपयांचा मदतीचा धनादेश सुपूर्त केला. 

दक्षिण काश्‍मीरमध्ये शंभराहून अधिक दहशतवादी कार्यरत असून, त्यात स्थानिकांचाही सहभाग असल्याचा दावा मेजर जनरल राजू यांनी केला आहे. लष्कर आणि जम्मू-काश्‍मीर पोलिसांनी संयुक्तरित्या मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम हाती घेतली आहे. दहशतवाद्यांमध्ये सामील होणाऱ्या स्थानिक तरुणांचेही मन परिवर्तन करण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन प्रयत्न केला जात आहे. मात्र, त्यावर खूप मर्यादा येत असल्याचे राजू यांनी सांगितले. 

दरम्यान, चिनाब खोऱ्यातील लष्करे तैयबाच्या प्रशिक्षण केंद्रावर छापा घालून एका माजी लष्करी जवानासह सात जणांना ताब्यात घेतल्याचा दावा जम्मू-काश्‍मीर पोलिसांनी केला. पोलिसांच्या विशेष पथकाने ही कामगिरी केल्याचे जम्मू विभागाचे पोलिस महासंचालक एस. डी. एस. जमवाल यांनी सांगितले.