गुजरातमध्ये दोन बहिणींवर सामूहिक बलात्कार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 मार्च 2017

बरिया याने हे क्रूर कृत्य या मुलींच्या वडिलांसमोरच केले. त्याने मुलींचे व त्यांच्या वडिलांचे अपहरण केले. आणि चालत्या गाडीमध्येच या दोन बहिणींवर बलात्कार करण्यात आला

बडोदा - गुजरात राज्यामधील दाहोद जिल्ह्यामध्ये दोन अल्पवयीन मुलींवर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या मुलींच्या भावाचा सूड घेण्यासाठी हे कृत्य करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या पीडित मुलींच्या भावास दारुचा अवैध धंदा केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. पोलिसांच्या चौकशीमध्ये त्याने कुमात बरिया याच्याकडून हा धंदा चालविला जात असल्याची माहिती दिली होती. याचा सूड घेण्यासाठी हा सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

या प्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या बरिया याला पोलिसांनी अटक केली आहे. बरिया याने हे क्रूर कृत्य या मुलींच्या वडिलांसमोरच केले. त्याने मुलींचे व त्यांच्या वडिलांचे अपहरण केले. आणि चालत्या गाडीमध्येच या दोन बहिणींवर बलात्कार करण्यात आला. दरम्यान, या नव्या प्रकरणामुळे या भागामधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.