दिल्लीत पुन्हा भाजपचीच सत्ता येणार; सर्वेक्षणांचा अंदाज

वृत्तसंस्था
शनिवार, 22 एप्रिल 2017

दिल्लीमध्ये 'आप'ची सत्ता असली, तरीही या तीनही महापालिकांवर भाजपचे वर्चस्व आहे. गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपच्या कारभारावर जनतेची नाराजी असली, तरीही मतदानपूर्व सर्वेक्षणांमध्ये भाजपकडेच लोकांचा कल झुकला आहे. 

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील तीनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपलाच बहुमत मिळेल, असा अंदाज दोन सर्वेक्षणांतून व्यक्त करण्यात आला आहे. दिल्लीतील सत्ताधारी 'आप'ला दुसऱ्या स्थानावरच समाधान मानावे लागेल, असाही या सर्वेक्षणांतील अंदाज आहे. दिल्लीतील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीच्या लढतीमध्ये यंदा प्रथमच भाजप, कॉंग्रेस आणि आप अशी तिहेरी लढत होत आहे. 

उत्तर दिल्ली, पूर्व दिल्ली आणि दक्षिण दिल्ली अशा तीनही महापालिकांमध्ये भाजपलाच दणदणीत बहुमत मिळेल, असा या सर्वेक्षणांतून समोर येत आहे. 'टाईम्स नाऊ' या वृत्तवाहिनीसाठी 'व्हीएमआर'ने केलेल्या सर्वेक्षणात तीन महापालिकांमध्ये मिळून 272 पैकी 195 जागा भाजपला मिळतील, असे दिसत आहे. 'एबीपी न्यूज'साठी 'सीव्होटर'ने केलेल्या सर्वेक्षणानुसार, उत्तर दिल्लीमध्ये 104 पैकी 76, दक्षिण दिल्लीमध्ये 104 पैकी 60 आणि पूर्व दिल्लीमध्ये 64 पैकी 43 जागा भाजपला मिळतील. 

'सीव्होटर'च्या सर्वेक्षणानुसार, सत्ताधारी 'आप'ला उत्तर दिल्लीमध्ये 13, दक्षिण दिल्लीमध्ये 21 तर पूर्व दिल्लीत 11 जागा मिळतील. कॉंग्रेसला या निवडणुकीत तीनही महापालिकांत मिळून 15 जागा मिळतील, असे 'व्हीएमआर'ने म्हटले आहे. 'सीव्होटर'च्या अंदाजानुसार, कॉंग्रेसला 26 जागा मिळू शकतील. 

विशेष म्हणजे दिल्लीमध्ये 'आप'ची सत्ता असली, तरीही या तीनही महापालिकांवर भाजपचे वर्चस्व आहे. गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपच्या कारभारावर जनतेची नाराजी असली, तरीही मतदानपूर्व सर्वेक्षणांमध्ये भाजपकडेच लोकांचा कल झुकला आहे.