कर्नाटकात आढळले निपाहचे दोन संशयित रुग्ण

वृत्तसंस्था
बुधवार, 23 मे 2018

''निपाह या आजाराची लक्षणं येथील 20 वर्षीय तरूणी आणि 75 वर्षीय वृद्ध व्यक्तीमध्ये आढळली आहेत. हे दोघे मंगलोर येथून केरळला आले होते. तेव्हा ते येथील निपाह व्हायरसची लागण झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्यांना लागण झाल्याची शक्यता आहे''.

- बी. व्ही. राजेश,  जिल्हा वैद्यकीय अधिकारी

नवी दिल्ली : केरळमध्ये निपाह व्हायरसची लागण झाल्यामुळे आतापर्यंत 10 हून अधिक लोक दगावले आहेत. निपाह या व्हायरसची लागण केरळमधील अनेकांना झाली आहे. मात्र, या आजाराचे दोन संशयित रुग्ण कर्नाटकात आढळले आहेत. या दोन संशयित रुग्णांवर वैद्यकीय उपचार करण्यात येत आहेत.

केरळमध्ये आतापर्यंत 10 हून अधिक जणांचा मृत्यू झाला. केरळमध्ये हा आजार पसरल्यानंतर आता हा आजार कर्नाटकात पसरण्याची शक्यता आहे. कर्नाटकात 20 वर्षीय तरूणी आणि 75 वर्षीय वृद्ध व्यक्ती या आजाराने पीडित असल्याच्या संशयातून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. याबाबत जिल्हा वैद्यकीय अधिकारी बी. व्ही. राजेश यांनी सांगितले, की ''निपाह या आजाराची लक्षणं येथील 20 वर्षीय तरूणी आणि 75 वर्षीय वृद्ध व्यक्तीमध्ये आढळली आहेत. हे दोघे मंगलोर येथून केरळला आले होते. तेव्हा ते येथील निपाह व्हायरसची लागण झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्यांना लागण झाल्याची शक्यता आहे''.   

nipah virus

''या दोघांना निपाह व्हायरसची लागण झाल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे याबाबत घाबरून जाण्याची गरज नाही. परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. तसेच या दोन संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने 'मनिपाल सेंटर ऑफ व्हायरस रिसर्च'कडे पाठविण्यात आले असून, याचा अहवालाची आम्ही वाट पाहत आहोत'', असे राजेश म्हणाले.  

Web Title: Two suspected cases of Nipah virus today reported from Karnataka