व्हिलचेअरसाठी मागितली लाच; रुग्णाचे हाल!

पीटीआय
शनिवार, 18 मार्च 2017

पत्नीने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडे व्हिलचेअरची मागणी केली. त्यावर कर्मचाऱ्यांनी 100-200 रुपयांची लाच मागितली. यापूर्वीही अनेकदा कर्मचाऱ्यांनी व्हिलचेअरसाठी लाच मागितली होती आणि संतोषीने ती दिली होती. मात्र, बुधवारी तिच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे तिने घरातून निघतानाच लहान मुलाची तीन चाकी सायकलसोबत आणली होती. कर्मचाऱ्यांनी व्हिलचेअर देण्यासाठी नकार दिल्याने संतोषीने तीन चाकी सायकलवर पतीला बसवून रुग्णालयात फिरवले.

हैदराबाद - येथील राज्य शासनाच्या गांधी रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चालू न शकणाऱ्या रुग्णाला रुग्णालय परिसरात उपचारासाठी फिरायचे असल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडे व्हिलचेअरची मागणी केली. मात्र कर्मचाऱ्यांनी मदत न करता व्हिलचेअर देण्यासाठी लाच मागितली. त्यामुळे असहाय झालेल्या रुग्णाला लहान मुलाच्या तीन चाकी सायकलवरून रुग्णालय परिसरात फिरावे लागले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने समिती स्थापन केली आहे.

मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात ए राजू (वय 40) याला वीजेचा झटका बसला होता. तेव्हापासून राजू, पत्नी संतोषीसोबत रुग्णालयात नियमितपणे उपचार घेत होता. बुधवारी तो नेहमीप्रमाणे संतोषीसोबत रुग्णालयात दाखल झाला. मात्र राजूला चालता येत नव्हते. त्यामुळे त्याच्या पत्नीने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडे व्हिलचेअरची मागणी केली. त्यावर कर्मचाऱ्यांनी 100-200 रुपयांची लाच मागितली. यापूर्वीही अनेकदा कर्मचाऱ्यांनी व्हिलचेअरसाठी लाच मागितली होती आणि संतोषीने ती दिली होती. मात्र, बुधवारी तिच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे तिने घरातून निघतानाच लहान मुलाची तीन चाकी सायकलसोबत आणली होती. कर्मचाऱ्यांनी व्हिलचेअर देण्यासाठी नकार दिल्याने संतोषीने तीन चाकी सायकलवर पतीला बसवून रुग्णालयात फिरवले.

याबाबत बोलताना संतोषी म्हणाली, "यापूर्वी किमान पाच ते सहा वेळा मी लाच दिली आहे. मात्र, बुधवारी माझ्याकडे पैसे नव्हते. व्हिलचेअर न मिळाल्याने मी तीन चाकी सायकल आणली आणि त्यावर बसून पतीला उपचारासाठी फिरवले.' याशिवाय पतीच्या उपचाराकडेही रुग्णालय दुर्लक्ष करत असल्याची तक्रार करताना संतोषी म्हणाली, "माझ्या पतीवर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले आहे. मात्र रुग्णालय प्रशासन बेडचा अभाव आणि अन्य काही कारणे सांगून शस्त्रक्रिया पुढे ढकलत आहेत. एवढ्या मोठ्या रुग्णालयात मदत करण्याऐवजी ते अडचणी निर्माण करत आहेत.'

दरम्यान रुग्णालय अधिक्षक डॉ. मंजुळा वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाल्या, "आम्हाला रुग्णाच्या नातेवाईकांकडून कोणत्याही प्रकारची लेखी तक्रार मिळालेली नाही. माध्यमातील वृत्तानुसार आम्ही या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. एका दिवसात अहवाल दिला जाईल. त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.