भारतातील मुस्लिम असुरक्षित - मावळते उपराष्ट्रपती अन्सारी

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

भारताचा समाज अनेक जाती धर्मांच्या लोकांना एकत्र घेऊन वर्षोनुवर्षे नांदत आहे. मात्र, हे वातावरण आता संकटात आहे. लोकांच्या भारतीयत्वावर आता प्रश्नचिन्ह निर्माण करण्याची प्रवृत्ती चिंताजनक आहे

नवी दिल्ली : देशातील मुस्लिमांमध्ये आज असुरक्षिततेबरोबरच भितीचे वातावरण आहे असे मत मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी व्यक्त केले आहे.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या वृत्तानुसार राज्यसभा टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत अन्सारी यांनी मुस्लिम समाजाविषयी मत व्यक्त केले आहे. अन्सारी यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्‍यता आहे. अन्सारी यांचा उपराष्ट्रपतिपदाच्या दुसऱ्या कालावधीचा आज अखेरचा दिवस आहे. अन्सारी यांनी या मुलाखतीत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

"देशातील मुस्लिम समाजात आज भीती आणि असुरक्षेततेची भावना, असल्याचे आकलन योग्य आहे. देशातील वेगवेगळ्या प्रांतातून अशाप्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. भारताचा समाज अनेक जाती धर्मांच्या लोकांना एकत्र घेऊन वर्षोनुवर्षे नांदत आहे. मात्र, हे वातावरण आता संकटात आहे. लोकांच्या भारतीयत्वावर आता प्रश्नचिन्ह निर्माण करण्याची प्रवृत्ती चिंताजनक असल्याची,' खंत अन्सारी यांनी व्यक्त केली आहे.