1 फेब्रुवारीला सादर होणार अर्थसंकल्प

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 जानेवारी 2017

केंद्र सरकारने यापूर्वीच रेल्वे अर्थसंकल्प जाहीर नसल्याचे स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे अर्थसंकल्पामध्येच सर्व गोष्टींचा समावेश असणार आहे.

नवी दिल्ली - संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 31 जानेवारीला सुरवात होणार असून, 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करण्यात येणार असल्याचे आज (मंगळवार) जाहीर करण्यात आले.

केंद्रीय मंत्रिमंडळातील संसदीय कामकाज समितीच्या आज झालेल्या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत निर्णय घेण्यात आला. 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारीदरम्यान पहिल्या टप्प्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडणार आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी संसदेच्या दोन्ही सभागृहांना 31 जानेवारीला संबोधित करतील. तसेच 31 जानेवारीलाच आर्थिक सर्वेक्षण जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करण्यात येईल.

केंद्र सरकारने यापूर्वीच रेल्वे अर्थसंकल्प जाहीर नसल्याचे स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे अर्थसंकल्पामध्येच सर्व गोष्टींचा समावेश असणार आहे. दरवर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी सादर होणारा अर्थसंकल्प यावर्षापासून लवकर सादर करण्यात येणार आहे.