चाईल्ड पोर्नोग्राफी:हैदराबादेत अमेरिकन नागरिक अटकेत

वृत्तसंस्था
बुधवार, 18 जानेवारी 2017

जोन्स याच्या लॅपटॉपसहच हार्ड ड्राईव्ह व आयफोनमध्येही प्रचंड प्रमाणात पोर्नोग्राफिक व्हिडिओ सापडले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जोन्स याने दिलेल्या जबानीत लहानपणापासूनच चाईल्ड पोर्नोग्राफी पाहण्याची सवय जडल्याचे म्हटले आहे

हैदराबाद - इंटरनेटच्या माध्यमामधून लहान मुलांचे अश्‍लील व्हिडिओ (चाईल्ड पोर्नोग्राफी) प्रसिद्ध करणाऱ्या एका 42 वर्षीय अमेरिकन नागरिकास हैदराबादमध्ये अटक करण्यात आली आहे. जेम्स किर्क जोन्स असे या अमेरिकन नागरिकाचे नाव असून तो मूळचा अमेरिकेतील न्यू जर्सी राज्यामधील आहे. 42 वर्षीय जोन्स हा हैदराबादमध्ये 2012 पासून भाषातज्ज्ञ म्हणून काम करत आहे.

तेलंगणामधील पोलिस दलाच्या सायबर गुन्हा शाखेस इंटरपोलकडून विशिष्ट "आयपी ऍड्रेस'वरुन लहान मुलांचे अश्‍लील व्हिडिओ प्रसिद्ध केले जात असल्याची माहिती मिळाली होती. हा आयपी ऍड्रेस जोन्स याच्या घरामधीलच असल्याचे पोलिसांच्या तपासामध्ये आढळून आले. जोन्स याला अटक करण्यात आली आहे.

जोन्स याच्या लॅपटॉपसहच हार्ड ड्राईव्ह व आयफोनमध्येही प्रचंड प्रमाणात पोर्नोग्राफिक व्हिडिओ सापडले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जोन्स याला न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली आहे. या गुन्ह्यांतर्गत दोषी आढळल्यास त्याला पाच वर्षांच्या कारवासाची शिक्षा सुनाविली जाण्याची शक्‍यता आहे. जोन्स याने दिलेल्या जबानीत लहानपणापासूनच चाईल्ड पोर्नोग्राफी पाहण्याची सवय जडल्याचे म्हटले आहे.