उत्तर प्रदेशला दत्तकपुत्रांची गरज नाही: प्रियांका गांधी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

तुम्ही कोणत्या प्रकारचा नेता निवडाल? दिलेली वचने न पाळणारा; वा या राज्यासाठी काम करणारा? उत्तर प्रदेशमधील प्रत्येक तरुणामध्ये नेता बनण्याची क्षमता आहे. ते राज्याच्या विकासाकरिता योगदान देतील

नवी दिल्ली - कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची कन्या असलेल्या प्रियांका गांधी यांनी आज (शुक्रवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत उत्तर प्रदेश राज्यास दत्तकपुत्रांची आवश्‍यकता आहे काय, अशी विचारणा केली.

गांधी या गांधी घराण्याचा मजबूत गड मानल्या जाणाऱ्या राय बरेली येथे बोलत होत्या. मोदी हे "बाहेरचे' असल्यावर अधिक भर देत प्रियांका त्यांनी उत्तर प्रदेशचे नेतृत्व या राज्यामधील नेत्यानेच करावे, असे मत व्यक्त केले.

""तुम्ही कोणत्या प्रकारचा नेता निवडाल? दिलेली वचने न पाळणारा; वा या राज्यासाठी काम करणारा? उत्तर प्रदेशमधील प्रत्येक तरुणामध्ये नेता बनण्याची क्षमता आहे. ते राज्याच्या विकासाकरिता योगदान देतील,'' असे प्रियांका म्हणाल्या. उत्तर प्रदेशमधील निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रियांका यांनी घेतलेली ही पहिलीच प्रचारसभा होती. त्या रायबरेली व अमेठीपलीकडे प्रचार करण्याची शक्‍यता अंधुक असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.