शिया बोर्ड रामास चांदीचे बाण देणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

उत्तर प्रदेश सरकारने रामाच्या मूर्तीच्या उभारणीचा घेतलेला निर्णय स्तुत्य असून, अवधची गंगा जमुनी परंपरा लक्षात घेता हे चांदीचे बाण शौर्य आणि आदराची पावती असेल, असे मंडळाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे. या मूर्तीमुळे उत्तर प्रदेश जगाच्या नकाशावर येईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे

लखनौ - अयोध्येत राम मंदिराची उभारणी सर्व भारतीयांसाठी अभिमानाची बाब असून, भगवान श्रीरामचंद्रांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी भेट म्हणून आम्ही दहा चांदीचे बाण देणार आहोत, अशी घोषणा उत्तर प्रदेश "शिया केंद्रीय वक्‍फ मंडळा'ने आज केली.

उत्तर प्रदेश सरकारने रामाच्या मूर्तीच्या उभारणीचा घेतलेला निर्णय स्तुत्य असून, अवधची गंगा जमुनी परंपरा लक्षात घेता हे चांदीचे बाण शौर्य आणि आदराची पावती असेल, असे मंडळाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे. या मूर्तीमुळे उत्तर प्रदेश जगाच्या नकाशावर येईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे.

"ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा'चे सदस्य जाफरयाब जिलानी आणि "एमआयएम'चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी या पुतळ्यास विरोध केला होता. या दोन्ही नेत्यांनी हे कृत्य बेकायदा आणि घटनाबाह्य असल्याचे म्हटले होते.

अयोध्येतील नवाबांनी नेहमीच मंदिरांचा आदर केला आहे. अयोध्येच्या मध्यवर्ती भागामध्ये उभारण्यात आलेल्या हनुमानगढीसाठीची जागा नवाब शुजाउद्दौल्लाह यांनी 1739 मध्ये जमीन दान केली होती, याकडेही रिझवी यांनी लक्ष वेधले.