सावित्रीसाठी सत्यवानाचे वडाभोवती रेशीमबंध!

जितेंद्र शिंदे
गुरुवार, 8 जून 2017

आयुष्यभर सावलीसारखी पाठीशी राहणाऱ्या पत्नीचे ऋण मानून झाल्या, गेल्या चुकांची माफी मागण्यासाठी कलियुगातील सत्यवानाने स्वत: वडाची पूजा करून उपवासही धरला. त्या सत्यवानाचे नाव आहे ऍड. माधव चव्हाण. निष्णात वकील असलेले चव्हाण यांनी परिवर्तनाचा झेंडा हाती घेऊन पत्नीप्रती कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी स्वत: वडाभोवती धागा गुंडाळून वटपौर्णिमा साजरी केली.

बेळगाव - सत्यवानाच्या जीवदानासाठी सावित्रीने वडाची पूजा केली. पण, सावित्रीची कृतज्ञता त्या सत्यवानाने व्यक्‍त केली असेल का? या प्रश्‍नाचे उत्तर तसे कठीणच. पण, आयुष्यभर सावलीसारखी पाठीशी राहणाऱ्या पत्नीचे ऋण मानून झाल्या, गेल्या चुकांची माफी मागण्यासाठी कलियुगातील सत्यवानाने स्वत: वडाची पूजा करून उपवासही धरला. त्या सत्यवानाचे नाव आहे ऍड. माधव चव्हाण. निष्णात वकील असलेले चव्हाण यांनी परिवर्तनाचा झेंडा हाती घेऊन पत्नीप्रती कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी स्वत: वडाभोवती धागा गुंडाळून वटपौर्णिमा साजरी केली.

आज (गुरुवार) सकाळी ऍड. माधव चव्हाण यांनी वडाच्या झाडाला धागे गुंडाळत प्रदक्षिणा घालून वटपौर्णिमा साजरी केली. वटपौर्णिमा लौकिक अर्थाने महिलांचा सण. पण, सर्व पारंपारिक प्रथेला छेद देत ऍड. चव्हाण यांनी परिवर्तनाची वाट चोखाळली. याबाबत "सकाळ'शी बोलताना ऍड. चव्हाण म्हणाले, ""समाजात स्त्री, पुरूष समानतेच्या अजूनही चर्चाच झडत आहेत. पण, ही समानता प्रत्यक्षात येणे गरजेचे आहे. पुरूषांइतकाच स्त्रीयांनाही अधिकार आहे. हे दर्शविण्यासाठी आणि प्रत्येक विवाहित पुरूषाच्या जीवनात पुरूषाइतकेत स्त्रीचाही वाटा तितकाच महत्वाचा आणि समान असतो. हे दर्शविण्यासाठी मी वटपौर्णिमा साजरी केली. स्त्रीयांप्रती सलाम करण्यासाठी माझा प्रयत्न होता. पुढील वर्षी हा कार्यक्रम व्यापक प्रमाणात करण्याचा माझा मनोदय आहे.'' महिलांना अजूनही दुय्यम स्थान आहे. प्रत्येकासाठी स्त्री त्याग करत असते. पण, तिचे साधे आभारही कोणी मानत नाही. त्यामुळेच ऍड. चव्हाण यांनी रूढी, परंपरांना छेद देत स्त्री, पुरूष समानतेचा नारा देण्यासाठी वटसावित्रीच्या सणाची निवड केली.

चुका मान्य करा
सार्वजनिक जीवनात जगताना कौटुंबिक पातळीवर अनेक चुका होता. त्या चुकांची माफी मागून, महिलांच्या पाया पडून विश्‍वासाला तडा जाणार नाही, याची काळजी घेण्यात आली तर वैवाहिक जीवन सुखकर आणि अधिक दृढ होईल, असे मत ऍड. चव्हाण यांनी व्यक्‍त केले.

प्रथांचे स्वरूप बदलणे आवश्‍यक
ऍड. चव्हाण म्हणतात, अख्यायिका, रूढी, पंरपरा या मानण्यावर असतात. पण, सध्याच्या काळात त्यांचे स्वरूप बदलणे आवश्‍यक आहे. समानतेची भावना वाढीस लागली की विश्‍वासाचे वातावरण निर्माण होते. त्यामुळेच आपण हा पुढाकार घेतला असून या उपक्रमाला लोकांचा प्रतिसाद लाभले, असा विश्‍वास आहे.

""सण कोणताही असो नात्यातील पावित्र्य जपणे आवश्‍यक असते. माझ्या आयुष्यात पत्नीचा (सौ. रेखा) वाटा मोठा आहे. त्यामुळेच तिच्याप्रती आदरभाव व्यक्‍त करणे माझे कर्तव्य आहे. ही जबाबदारी दोघांचीही असते. आज मी वटपौर्णिमा साजरी केली. त्याबाबत लोकांच्या प्रतिक्रिया खूप चांगल्या आहेत. त्यामुळे पुढील वर्षी अधिक व्यापकतेने हा सण साजरा करण्यात येईल.''
- ऍड. माधव चव्हाण, बेळगाव.