उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक 5 ऑगस्टला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

संसदेच्या दोन्ही सभागृहाचे एकूण ७९० सदस्य या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

नवी दिल्ली : उपराष्ट्रपतिपदासाठीची निवडणूक येत्या ५ ऑगस्ट रोजी होणार आहे. निवडणूक आयोगाने आज (गुरुवार) उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यानंतर त्यापाठोपाठ आता उपराष्ट्रपतिपदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 18 जुलैपर्यंत आहे.

संसदेच्या दोन्ही सभागृहाचे एकूण ७९० सदस्य या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान ५ ऑगस्टला होईल आणि त्याच दिवशी मतमोजणीसुद्धा केली जाईल. सध्याचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा कार्यकाल १० ऑगस्टला संपणार आहे. मतदानाच्या दिवशीच निकाल जाहीर करण्यात येणार आहे, त्यामुळे नवे उपराष्ट्रपती कोण होणार हे 5 ऑगस्टलाच स्पष्ट होणार आहे.