'सेहवाग बीसीसीआयसाठी खेळला, भारतासाठी नव्हे'

वृत्तसंस्था
बुधवार, 1 मार्च 2017

गुरमेहरच्या समर्थनार्थ हजारो शिक्षक, विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. हे सर्वजण एक नव्या भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. याचा मुळ हेतू न्याय, स्वातंत्र्य आणि समानता हा आहे. सेहवाग हा बीसीसीआयसाठी खेळतो, तो भारताचे प्रतिनिधित्व करत नाही.

नवी दिल्ली - कारगिलमधील हुतात्मा कॅप्टन मनदीपसिंह यांची मुलगी गुरमेहर कौरची खिल्ली उडविणारा भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग हा बीसीसीआयसाठी खेळला आहे, भारताचे प्रतिनिधित्व त्याने केलेले नाही, अशी तिखट प्रतिक्रिया जेएनयूतील विद्यार्थी उमर खालिद याने व्यक्त केली.

माझ्या वडिलांना पाकिस्तानने नव्हे, युद्धाने मारले, अशा मजकुराचा फलक घेऊन सोशल मिडीयावर छायाचित्र प्रसिद्ध करणाऱ्या गुरमेहर कौरची खिल्ली उडविताना वीरेंद्र सेहवागने दोन त्रिशतके मी नाही, तर माझ्या बॅटने केली असे म्हटले होते. आता गुरमेहर कौरच्या समर्थनार्थ मैदानात उमर खालिदसह बॉलिवूडमधील मंडळी जावेद अख्तर आणि नसीरुद्दीन शहा हेही उतरले आहेत. वीरेंद्र सेहवागच्या ट्विटवर आक्षेप घेत उमर खालिदने ट्विट केले आहे, की गुरमेहरच्या समर्थनार्थ हजारो शिक्षक, विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. हे सर्वजण एक नव्या भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. याचा मुळ हेतू न्याय, स्वातंत्र्य आणि समानता हा आहे. सेहवाग हा बीसीसीआयसाठी खेळतो, तो भारताचे प्रतिनिधित्व करत नाही. 

दिल्ली विद्यापीठाच्या रामजास महाविद्यालयात बुधवारी (ता. 22) अभाविप आणि डाव्या विचारसरणीच्या "ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशन'च्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरमेहर कौर हिने सोशल मीडियावर "अभाविपला मी घाबरत नाही' असा प्रचार सुरू केला. तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. 'जेएनयू'मधील विद्यार्थी उमर खालिद आणि शेहला मसूद यांना चर्चासत्रासाठी आमंत्रित करण्यावरून तणाव निर्माण झाला होता.

Web Title: virendra sehwag represents bcci not india umar khalid