राणेंची 'हात' चलाखी; भाजपला साथ?

अवित बगळे
गुरुवार, 16 मार्च 2017

पर्रीकरांची पूर्वअट...

विश्वजित राणे हे भाजपमध्ये जाणार की निवडणुकीच्या काही दिवस असताना त्यांनी नोंदणी केलेल्या सत्तरी युवा मोर्चा या पक्षाकडून निवडणूक लढणार हे स्पष्ट झालेले नाही. यात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर घालणार असलेली पूर्वअटच महत्त्वाची भूमिका बजावेल असे दिसते.

पणजी : भाजपच्या मनोहर पर्रीकर सरकारविरोधात मतदान करण्याचा पक्षादेश (व्हिप) धुडकावल्याप्रकरणी काँग्रेसचे वाळपईचे आमदार विश्वजित राणे यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी पुढे सरसावण्यापूर्वीच त्यांनी आमदारकीचा राजीनामा सादर केला. हंगामी सभापतिपद सिद्धार्थ कुंकळकर यांनी तत्काळ तो मंजूर केला आहे. पक्ष बदलण्यासाठी आमदारकी सोडण्याची विश्वजित राणे यांची ही दुसरी वेळ आहे.

वाळपई मतदारसंघातूनही विश्वजित हे २००७ मध्ये काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते. त्यावेळी एका कुटुंबात दोन जणांना (त्यांचे वडील प्रतापसिंह राणे हे पर्ये मतदारसंघातूनही लढत होते.) उमेदवारी देण्यात येणार नसल्याचे कारण देत त्या्ंना काँग्रेसने उमेदवारी नाकारली. त्यामुऴे विश्वजित यांनी २००७ ची निवडणूक अपक्ष म्हणून लढवून जिंकली. त्यावेळी त्यांच्याविरोधातील काँग्रेस उमेदवाराने माघार घेतली होती. 
२०१० मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढविली आणि ते जिंकले. त्यानंतर २०१२ आणि आताची २०१७ ची विधानसभा निवडणूक त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर जिंकली.

काँग्रेस पक्षाचे आता आपला पक्ष विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष असूनही सत्ता स्थापनेची संधी राज्यपालांनी न दिल्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्या याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार बहुमत सिद्ध करण्यासाठी विधानसभेत खास अधिवेशन आज बोलावण्यात आले होते. त्यावेळी मांडण्याचे येणाऱ्या ठरावाविरोधात मतदान करावे असा व्हिप काल काँग्रेसने जारी केला होता. मात्र आज ठरावाच्या मतदानावेळी विश्वजित राणे विधानसभेच्या बाहेर निघून गेले. यामुळेच त्या्ंनी पक्षादेश धुडकावल्याची कारवाई करावी असा विचार काँग्रेसने चालवला होता. मात्र विधीमंडळ नेता निवडीप्रमाणे याहीबाबतीत काँग्रेस तातडीने निर्णय घेऊ शकली नाही आणि त्याची संधी घेत विश्वजित राणे यांनी पदाचा राजीनामाच सादर केला.

हंगामी सभापती सिद्धार्थ कुंकळकर यांनी सांगितले की आमदारांनी राजीनामा देण्यासाठी अर्जांचा एक नमुना आहे. त्याच्या नमून्यात राणे यांनी राजीनामा दिला आहे. त्यात त्यांनी कोणतेही कारण देण्याच्या प्रश्नच नाही कारण तशी तरतूदच नाही.
विश्वजित राणे यांनी सांगितले, की वाळपईच्या जनतेच्या त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. काँग्रेसमध्ये राहून त्या पूर्ण होणार असे दिसत नाही. त्यामुळे पक्ष व आमदारकी सोडण्याचा निर्णय घेतला. मागच्या खेपेपेक्षा यावेळी मताधिक्य दुपटीने वाढले होते, त्यात आणखीन वाढ आता होईल.

असे असले तरी विश्वजित राणे हे भाजपमध्ये जाणार की निवडणुकीच्या काही दिवस असताना त्यांनी नोंदणी केलेल्या सत्तरी युवा मोर्चा या पक्षाकडून निवडणूक लढणार हे स्पष्ट झालेले नाही. यात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर घालणार असलेली पूर्वअटच महत्त्वाची भूमिका बजावेल असे दिसते.
 

Web Title: vishwajit rane resigns; probably to contest election from bjp