उत्तर प्रदेश : यापैकी कोण होईल मुख्यमंत्री?

rajnath singh, keshav prasad maurya
rajnath singh, keshav prasad maurya

उत्तर प्रदेशात निर्विवाद बहुमताच्या दिशेने वाटचाल करणाऱया भाजपने निवडणुकीत मुख्यमंत्रीपदासाठी कोणताही चेहरा प्रोजेक्ट केला नव्हता. एकीकडे विद्यमान मुख्यमंत्री, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव आणि दुसरीकडे बहुजन समाज पक्षाच्या मायावती थेट मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून उत्तर प्रदेशच्या मतदारांसमोर जात असताना भाजपने मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रचार यंत्रणेवर भीस्त ठेवली होती. निकालाचा कल स्पष्ट होत आहे, तसे भाजपमधील मुख्यमंत्रीपदाचे संभाव्य उमेदवार कोण असतील, याबद्दल खल सुरू झाला आहे. 

यापैकी कोण होईल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री?
राजनाथ सिंह  :
राजनाथ सिंह यांनी यापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्रीपद सांभाळले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून ते भाजपच्या अंतर्गत पक्ष संघटनेपर्यंत त्यांची पोहोच आहे. त्यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे राहू शकते. सध्या त्यांच्याकडे केंद्रीय गृहमंत्रीपदाचा कार्यभार आहे. भाजपमध्ये मोदींपाठोपाठ सर्वात प्रभावशाली नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. मात्र, दिल्लीत रमलेल्या राजनाथ सिंह यांना उत्तर प्रदेशच्या राजकारणात परतायचे आहे की नाही, याबद्दल शंका आहे. 

केशव प्रसाद मौर्य :
केशव प्रसाद मोर्य हे नाव भाजपमध्ये 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर चढत्या क्रमाने घेतले जात आहे. त्यांच्या व्युहरचनेनुसार भाजपने उत्तर प्रदेशात सातत्याने ओबीसी मतदारांना आकर्षिक केले आहे. उत्तर प्रदेशात तब्बल 54 टक्के ओबीसी समाज आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना भाजपला ओबीसी मतदार प्रचंड आधार ठरणार आहे. त्यामुळे मौर्य यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे, त्यात नवल नाही. भाजपने कल्याण सिंह यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशात सर्वप्रथम सत्ता मिळविली होती. त्या काळात यादवेतर ओबीसी आणि ईबीसी या दोन गटांना कल्याण सिंह यांनी एकत्र केले होते. हीच परिस्थिती मौर्य यांच्या कारकीर्दीत आहे. शिवाय, पक्ष संघटनेत आणि संघामध्ये त्यांची पाळेमुळे खोलवर रुजली आहेत. 

डॉ. दिनेश शर्मा :
दिनेश शर्मा लखनौचे महापौर आणि भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. संघामध्ये त्यांना मानणारा वर्ग आहे. पक्षातही त्यांना चांगले स्थान आहे. कोणत्याही प्रकारच्या आरोपांपासून ते दूर राहिले आहेत. पक्षाच्या देशव्यापी सदस्य नोंदणी अभियानात त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. भाजपने जगातील सर्वात जास्त सदस्य असलेला राजकीय पक्ष बनल्याचा दावा केला, तो डॉ. शर्मा यांच्या कामगिरीच्या जोरावर. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांना पक्षाने थेट राष्ट्रीय उपाध्यक्ष केले. अध्यक्ष अमित शहा यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध आहे. त्यामुळेच डॉ. शर्मा यांना गुजरातमध्ये पक्षाच्या प्रभारीदेखील बनवले आहे. 

श्रीकांत शर्मा : 
मथुरामधील वृंदावन मतदारसंघातून भाजपने उमेदवारी दिल्यापासून श्रीकांत शर्मा यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार मानले जात आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या काळात राष्ट्रीय प्रवक्तेपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांचे निकटवर्तीय म्हणूनही शर्मा यांना उत्तर प्रदेशात ओळखले जाते. राष्ट्रीय प्रवक्ते असलेले सर्वानंद सोनोवाल यांना भाजपने आसाममध्ये मुख्यमंत्री बनविले होते. उत्तर प्रदेशातही शर्मा यांच्याबाबतीत तसे घडायची शक्यता आहे. शर्मा संघाचे कट्टर कार्यकर्ते आणि तरूण आहेत. 

मनोज सिन्हा : 
पूर्वांचल भागातील मनोज सिन्हा यांना उत्तर प्रदेशात राजनाथ सिंह यांचे जवळचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जाते. पूर्वांचल राज्यांमध्ये पक्षाने सातत्याने लक्ष केंद्रीत केले होते. पूर्वांचलमधील विजय हा भाजपला सत्तेवर नेणारी किल्ली आहे, असे खुद्द पंतप्रधान मोदी यांचे मत आहे. रेल्वे राज्यमंत्री असलेले सिन्हा यांचे कौतूक मोदी यांनी वारंवार केले आहे. केशव प्रसाद मौर्य यांना प्रदेशाध्यक्ष, बिहारमध्ये नित्यानंद राय आणि झारखंडमध्ये ताला मरांडी यांना प्रदेशाध्यक्ष बनवून भाजपने यापूर्वी सगळ्यांना चक्रावून सोडले होते. आताही सिन्हा यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घालून भाजप आश्चर्याचा धक्का देऊ शकते. 

स्मृती इराणी : 
आक्रमक स्मृती इराणी मुख्यमंत्री बनू शकतात. त्या केवळ स्टार प्रचारक नाहीत; तर त्यांच्याकडे चांगले वक्तृत्वदेखील आहे. तरूण आणि महिलांमध्ये इराणी लोकप्रिय आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांना अमेठी मतदारसंघात कडवी लढत दिली होती. त्यामुळेच, पराभव होऊनही त्यांना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान दिले गेले होते. 

योगी आदित्यनाथ : 
जळजळीत भाषणांबद्दल प्रसिद्ध असलेले योगी आदित्यनाथ यांचे स्थान पूर्वांचलच्या राजकारणात महत्वाचे आहे. त्यांच्या वक्तृत्वकलेचा वापर भाजपने उत्तर प्रदेशातील निवडणुकीतही जोरदारपणे करून घेतला. पश्चिम उत्तर प्रदेश ते पूर्व उत्तर प्रदेश या पट्ट्यात आदित्यनाथ यांच्या प्रचारसभांना झालेली अलोट गर्दी त्यांची लोकप्रियता सांगणारी होती. संघामध्ये त्यांना मानणारा वर्ग आहे. मात्र, पक्ष संघटनेत आदित्यनाथ यांचे स्थान थोडे कमकुवत आहे. 

उमा भारती : 
उत्तर प्रदेशात निवडणूक काळात केंद्रीय मंत्री उमा भारती यांचा फोटो पोस्टरवर अनेक ठिकाणी अग्रभागी झळकला आहे. मध्य प्रदेशच्या उमा भारती यांना 2012 मध्ये भाजपने उत्तर प्रदेशातील निवडणूक रिंगणात उतरवले. त्यावेळी भाजपला फार काही यश मिळाले नाही. त्यानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत उमा भारती यांना झाँसी मतदारसंघातून पक्षाने उमेदवारी दिली. तेथे त्या विजयी झाल्या. मात्र, चरखारी या त्यांच्या विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला हार पत्करावी लागली. उमा भारती यांनी प्रचार सभांचा तडाखा लावला होता. पक्षासाठी मोठे नाव असलेल्या उमा भारती संघटनात्मक कामात मात्र पिछाडीवर आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com