सतत जिंकायला आपण नेपोलियन नाहीत : केजरीवाल

वृत्तसंस्था
रविवार, 19 मार्च 2017

"एकामागोमाग एक निवडणुका जिंकायला आपण काही नेपोलियन नाहीत. आम्ही येथे राष्ट्रविकास करत आहोत. तुम्ही सत्याचा मार्ग निवडला आहे. हा मार्ग काटेरी आहे. मात्र अखेर सत्याचाच विजय होईल. तुमच्या कष्टाला मी सलाम करतो.'

नवी दिल्ली - पंजाब आणि गोवा विधानसभा निवडणुकीत दारूण पराभावाला सामोरे जावे लागल्यानंतर आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सतत जिंकायला आपण नेपोलियन नाहीत, असे म्हणत सध्या दिल्लीतील महानगरपालिकांच्या निवडणुकांवर लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.

शनिवारी केजरीवाल यांनी "फेसबुक लाईव्ह'च्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. "आप'च्या पराभवाबद्दल बोलताना ते म्हणाले, "एकामागोमाग एक निवडणुका जिंकायला आपण काही नेपोलियन नाहीत. आम्ही येथे राष्ट्रविकास करत आहोत. तुम्ही सत्याचा मार्ग निवडला आहे. हा मार्ग काटेरी आहे. मात्र अखेर सत्याचाच विजय होईल. तुमच्या कष्टाला मी सलाम करतो.' दिल्लीतील तीन महानगरपालिकांमध्ये लवकरच निवडणुका होणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर बोलताना ते म्हणाले, "दिल्ली महानगरपालिका भ्रष्टाचारमुक्त करून तेथे स्वराज्य उभारणे आणि दिल्लीला लंडन आणि पॅरिसप्रमाणे करणे याकडे महानगरपालिका निवडणुकीदरम्यान "आप'चे लक्ष असेल. जर "आप'सारखा प्रामाणिक पक्ष दिल्ली महानगरपालिका जिंकला तर दिल्ली स्वच्छ होईल. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राचा विकास होईल.' कार्यकर्त्यांनी सूचना देताना केजरीवाल म्हणाले, "दिल्ली सरकारच्या कामाचा प्रचार देशभर करा आणि बूथ पातळीवरचे संघटन करा.' यावेळी केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांच्या प्रश्‍नांनाही उत्तरे दिली.

"फेसबुक लाईव्ह'ला मोठा प्रतिसाद
केजरीवाल यांनी फेसबुक लाईव्ह व्हिडिओद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियाही उपस्थित होते. या लाईव्ह व्हिडिओला 22 हजार पेक्षा अधिक जणांनी प्रतिसाद दिला आहे. तर त्यावर 20 हजार पेक्षा अधिक प्रतिक्रिया आल्य असून 2800 पेक्षा अधिक जणांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.