बंगालमध्ये "तृणमूल'च्या पुढाकाराने गणेशोत्सव

ganesh festival
ganesh festival

कोलकता - महाराष्ट्रासह देशाच्या पश्‍चिमेकडील राज्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मात्र आता पश्‍चिम बंगालमध्येही गणेशोत्सव ठिकठिकाणी साजरा होऊ लागलेला आहे. विशेष म्हणजे सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसने यासाठी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला आहे.

राज्यात भाजपकडून रामनवमी, हनुमान जयंती व रथयात्रा काढली जाते. हिंदू मतपेढीवर डोळा ठेवून भाजपकडून हे सोहळे मोठ्या प्रमाणात आयोजित केले जातात. त्यामुळेच की काय आता तृणमूल कॉंग्रेसने गणेशपूजांचे आयोजन करण्यास सुरवात केली आहे. राजधानी कोलकतासह राज्यातील बहुतांश शहरात अनेक ठिकाणी गणेशोत्सव साजरा होत आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी तृणमूल कॉंग्रेसचे मंत्री शोहनदेव चटोपाध्याय यांनी तृणमूल कॉंग्रेस भवनमध्ये गणेशपूजा केली. राज्यात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या दुर्गापूजेचे तृणमूल कॉंग्रेसचे आमदार, खासदार, मंत्री आश्रयदाते असतात. आता त्यांनी गणेश उत्सवासाठी पुढाकार घेण्यास सुरवात केली आहे.

"तृणमूल'चे मंत्री शोहनदेव चटोपाध्याय, शशी पांजा, ज्योतिप्रिय मुलीक यांनी अनेक ठिकाणी गणेशपूजांचा प्रारंभ केला. विशेष म्हणजे अन्य पूजा उत्सवांसाठी ज्याप्रमाणे लोकवर्गणी गोळा केली जाते तशी वर्गणी या वेळी गोळा केलेली नाही. सर्व क्षेत्रांत उत्पादन घटल्याने लोकांना पुन्हा का त्रास द्यायचा, हा यामागचा हेतू असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात येते. त्याऐवजी राजकीय नेते, प्रभावशाली लोक व उद्योजकांनी गणेशोत्सवाचा खर्च उचलला आहे.

राज्यात वाढत असलेल्या गणेशोत्सवाचे तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्यांनी समर्थन केले आहे. ग्राहक कल्याणमंत्री सधन पांडे म्हणाले, ""गणेशाची पूजा शुभकामासाठी आवश्‍यक आहे. माझ्या मुलीने घरात गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. विधानसभा निवडणुकांवेळी भाजपने धार्मिक श्रद्धांची राजकारणाशी सांगड घालून लोकांचे लक्ष चुकीच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याना यात अपयश आले.'' ज्योतिप्रिय मुलीक म्हणाले, ""या निमित्ताने आम्ही भाजपला हिदुत्वाचा अजेंडा राबवू न देण्याचा प्रयत्न करीत आहोत.''

या गणेशोत्सवाच्या निमित्ताने तृणमूल कॉंग्रेसचे नेते पैसे गोळा करीत आहेत. त्यांनी निधीसंकलनासाठी हा नवा मार्ग निवडला आहे. धार्मिक श्रद्धेशी त्यांना काही देणे-घेणे नसल्याचा आरोप भाजप प्रदेश सरचिटणिसांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com