दुर्मीळ वस्तू परत आणण्यासाठी काय प्रयत्न केले? पंतप्रधान कार्यालयाकडे विचारणा 

वृत्तसंस्था
सोमवार, 4 जून 2018

या वस्तूही परदेशात 
अर्जदाराने गुप्त साम्राज्याच्या काळातील तांब्याची बुद्ध मूर्ती (सुलतानगंज बुद्ध), नासक हिरा, टिपू सुलतानची अंगठी आणि यांत्रिक वाघ, अमरावतीचे अवशेष, वाग्देवी (सरस्वती देवीची संगमरवरी मूर्ती) या वस्तूंबाबतची विचारणा केली आहे. या दुर्मीळ वस्तू या भारतीय समृद्धीचा आणि कलात्मकतेचा नमुना असून, आक्रमकांनी आणि परकी सत्ताधीशांनी भारतातून नेलेल्या या वस्तू जगभरातील इतर वस्तू संग्रहालयांची शोभा वाढवित आहेत. 

नवी दिल्ली : कोहिनूर हिरा, महाराज रणजितसिंग यांचे सुवर्ण सिंहासन, शहाजहानचा रत्नजडित पेला आणि टिपू सुलतानची तलवार भारतात परत आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती देण्याचे आदेश केंद्रीय माहिती आयोगाने पंतप्रधान कार्यालय आणि परराष्ट्र मंत्रालयाला दिले आहेत. 

या वस्तू भारतात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची चौकशी करण्याबाबत माहिती अधिकार कायद्याअंतर्गत बी. के. एस. आर. अय्यंगार यांनी परराष्ट्र मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयात अर्ज केला असता, दोन्ही कार्यालयांनी हा अर्ज भारतीय पुरातत्व विभागाकडे वर्ग केला. मात्र, केवळ बेकायदा पद्धतीने भारताबाहेर निर्यात केलेल्या वस्तूंसाठीच आपण प्रयत्न करू शकत असल्याचे या विभागाने उत्तर दिले. 2014 ते 2017 या कालावधीत 25 दुर्मीळ वस्तू परत मिळविल्याची माहितीही या विभागाने दिली. तसेच पंतप्रधान कार्यालयाने हा अर्ज आपल्याकडे का पाठविला, याबाबतही विभागाने आश्‍चर्य व्यक्त केले. यावर माहिती आयुक्त श्रीधर आचार्युलू यांनी पंतप्रधान कार्यालय आणि परराष्ट्र मंत्रालयाला त्यांनी केलेल्या प्रयत्नांची माहिती देण्याचे आदेश दिले. या वस्तू भारतीय इतिहासाचा भाग असून, नागरिकांच्या भावना त्याच्याशी जोडल्या गेल्या आहेत, त्यामुळे सरकारला त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे आचार्युलू यांनी सांगितले. 

या वस्तूही परदेशात 
अर्जदाराने गुप्त साम्राज्याच्या काळातील तांब्याची बुद्ध मूर्ती (सुलतानगंज बुद्ध), नासक हिरा, टिपू सुलतानची अंगठी आणि यांत्रिक वाघ, अमरावतीचे अवशेष, वाग्देवी (सरस्वती देवीची संगमरवरी मूर्ती) या वस्तूंबाबतची विचारणा केली आहे. या दुर्मीळ वस्तू या भारतीय समृद्धीचा आणि कलात्मकतेचा नमुना असून, आक्रमकांनी आणि परकी सत्ताधीशांनी भारतातून नेलेल्या या वस्तू जगभरातील इतर वस्तू संग्रहालयांची शोभा वाढवित आहेत. 

Web Title: What efforts to bring back the rare things? Ask to PMO