'मोदी फेस्ट'वर राहुल गांधींची टीका; 'सरकार नेमके काय साजरे करत आहे?'

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 मे 2017

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष मोठा समारंभ आयोजित करणार आहे. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्‌विटरद्वारे 'सरकार नेमके काय साजरे करत आहे?' असे म्हणत टीका केली आहे.

गांधी यांनी 'मोदी फेस्ट'बाबत वृत्तपत्रातील बातम्यांचे स्क्रिनशॉटस्‌ शेअर करत सरकारवर निशाणा साधला आहे. 'युवक नोकऱ्यांसाठी झगडत आहेत, शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि सैनिक सीमेवर हुतात्मा होत आहेत. सरकार नेमके काय साजरे करत आहे?', असा प्रश्‍न गांधी यांनी उपस्थित केला आहे. 'तीन वर्षांत केवळ अकार्यक्षमता, खोटी आश्‍वासने आणि जनतेचा विश्‍वासघात झाला', अशी टीकाही दुसऱ्या एका ट्विटद्वारे गांधी यांनी केली आहे. भारतीय जनता पक्षाद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या 'मोदी फेस्ट'मध्ये मोदी सरकारचा विकासाचा अजेंडा आणि मोदी सरकारने केलेल्या विकासकामांचा प्रचार-प्रसार करण्यात येणार आहे.