नेत्यांच्या हट्टापुढे पोलिसांना काय पर्याय? - अहीर

नेत्यांच्या हट्टापुढे पोलिसांना काय पर्याय? - अहीर

नवी दिल्ली - एका दुर्दैवी आत्महत्येवरून एखाद्या नेत्याने गर्दी जमवून व वर्दळीच्या रस्त्यावर उभे राहून "मला ताब्यातच घ्या, मी पोलिस ठाण्यातच जाणार,' असा हट्टच धरला तर पोलिसांकडे काय पर्याय राहतो? अशा शब्दांत केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी माजी सैनिकाच्या मृत्यूचे राजकारण केल्याबद्दल कॉंग्रेसवर व "आप'वर कडाडून हल्ला चढविला आहे.

कोणाच्याही मृत्यूचा राजकीय हत्यार म्हणून वापर करता कामा नये, असे सांगून ते म्हणाले, ""मी दिल्ली पोलिसांची कारवाई सरसकट बरोबर असे म्हणत नाही. पण पोलिसांनी त्या क्षणी जे केले ते कायद्याच्या दृष्टीने उचित असल्याचे माझे मत आहे. माजी सैनिक रामकिशन ग्रेवाल यांची आत्महत्या अतिशय दुःखद आहे. मात्र त्याच्याआडून कॉंग्रेस व "आप' जे राजकारण करत आहेत ते निंदनीय आहे. राहुल गांधी व "आप' नेत्यांनी त्या दिवशी कॅनॉट प्लेस भागातील वर्दळीच्या रस्त्यावर जे आंदोलन केले,

त्यामुळे विशेषतः "आप'च्या कार्यकर्त्यांच्या वर्तनाने तेथे अराजकाची परिस्थिती निर्माण केली. पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने अगदी अखेरचा पर्याय म्हणून त्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या नेत्यांना त्यांच्या घरी जाऊन अटक केली नाही. तेथे जमलेल्या व पंतप्रधानांच्या विरोधात घोषणा देणाऱ्या जमावावर पाण्याचे फवारे, लाठीमार असे काहीही केले नाही. "येथून हटणार नाही, आपल्याला ताब्यातच घ्या, आपण पोलिस ठाण्यातच जाणार,' असे राहुल सांगू लागले, तर पोलिस दुसरे काय करणार? राहुल गांधी यांनी हा मुद्दा राजकीय करायला नको होता. किमान कॉंग्रेससारख्या जुन्या पक्षाच्या नेत्यांनी असे राजकारण करणे योग्य नाही.'' पोलिसांनी त्यांचे काम केले आहे व करत राहतील. पोलिसांची कारवाई ही फार कठोर नाही, असे त्यांनी नमूद केले.

'जेएनयू'च्या वैभवाला काळिमा
प्रख्यात "जेएनयू'तील नजीब अहमद या बेपत्ता विद्यार्थ्याच्या शोधासाठी केंद्राने विशेष तपास पथक स्थापन केल्याचे सांगताना अहीर म्हणाले, 'परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना भडकावण्याचे व अभ्यासावरून त्यांचे लक्ष विचलित करण्याचे काम अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. स्वतः मुख्यमंत्री असूनही, "जेएनयू'मध्ये जाऊन विद्यार्थ्यांना, तुम्ही रस्त्यावर उतरा, इंडिया गेट, जंतरमंतरवर जा, आंदोलन करा, अशी भाषा वापरणे बेजबाबदारपणाचे आहे. या विद्यापीठातील वातावरण बिघडलेले नाही. पण हे राजकीय नेते तेथे गेल्यावर वातावरण दूषित व गढूळ होते. शैक्षणिक संस्थांना राजकीय अड्डा बनविणाऱ्यांना जाणत्या लोकांनी विरोध केला पाहिजे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com