'यूपी'चा CM कोण- राजनाथसिंह, उमा भारती की दिनेश शर्मा?

वृत्तसंस्था
रविवार, 12 मार्च 2017

भाजपची आज बैठक; राजनाथसिंहांसह तीन नावे चर्चेत
उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत प्रदेशाध्यक्ष केशवप्रसाद मौर्य, श्रीकांत शर्मा, योगी आदित्यनाथ, मंत्री मनोज सिन्हा, महेश शर्मा, खासदार व भोजपुरी अभिनेते मनोज तिवारी आदी अनेक नावे असली, तरी अखेर दोन- तीन नावांवरच गांभीर्याने बोलले जाते. ही नावे म्हणजे गृहमंत्री राजनाथसिंह, लखनौचे महापौर दिनेश शर्मा व मंत्री उमा भारती.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील दणदणीत विजयाचा पहिला भर ओसरल्यावर भाजपमध्ये आता कोण होणार मुख्यमंत्री, अशी चर्चा पडद्याआड रंगली आहे. उत्तर प्रदेश व उत्तराखंडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपला मिळवून दिलेल्या जवळपास एकहाती विजयानंतर या राज्यांचे कारभारी म्हणजेच मुख्यमंत्री ठरविण्याचाही अधिकार फक्त त्यांच्याकडेच आहे. यापूर्वी महाराष्ट्र व हरियानात या नियुक्‍त्या करताना मोदींनी धक्कातंत्र वापरले होते. मात्र उत्तर प्रदेशाबाबत ते एवढा धोका पत्करतील, की एखाद्या ज्येष्ठ नेत्याची किंवा चर्चित चेहऱ्याची निवड करतील याची उत्सुकता आहे.

भाजपचे नवे मुख्यमंत्री कोण, या मुद्द्यावर खल करण्यासाठी भाजप संसदीय मंडळ बैठकीचा उपचार उद्या (ता. 12) पार पाडणार आहे. उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत प्रदेशाध्यक्ष केशवप्रसाद मौर्य, श्रीकांत शर्मा, योगी आदित्यनाथ, मंत्री मनोज सिन्हा, महेश शर्मा, खासदार व भोजपुरी अभिनेते मनोज तिवारी आदी अनेक नावे असली, तरी अखेर दोन- तीन नावांवरच गांभीर्याने बोलले जाते. ही नावे म्हणजे गृहमंत्री राजनाथसिंह, लखनौचे महापौर दिनेश शर्मा व मंत्री उमा भारती. राजनाथसिंह यांनी एकदा मुख्यमंत्रिपद सांभाळले आहे. याबाबत त्यांना काल संसद परिसरात पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी मी 11 मार्चनंतरही देशाचा गृहमंत्रीच असेन, असे ठामपणे सांगितले होते. ते स्वतःच राज्यात परतण्यास उत्सुक नसल्याचेही सांगितले जाते. त्याएवजी आपले पुत्र पंकजसिंह यांना मंत्रिपद देण्याचा आग्रह ते मोदींकडे धरतील अशी शक्‍यता आहे. मात्र, मोदींनी हे विशाल राज्य 2019 च्या पार्श्‍वभूमीवर एखाद्या अनुभवी नेत्याकडेच हवे असा निर्णय घेतला, तर राजनाथ यांच्या व्यतिरिक्त भाजपकडे दुसरा चेहराच नाही.

लखनौचे महापौर दिनेश शर्मा यांचे नाव गांभीर्याने आघाडीवर घेतले जाते. अतिशय कमी बोलणारे व भरपूर काम करणारे अशी प्रतिमा असलेले शर्मा यांनी लखनौचे महापौर म्हणून केलेल्या कामाने अमित शहा चांगलेच प्रभावित झाले आहेत. त्यामुळेच त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्षपदाबरोबरच मोदींनी गुजरातचे प्रभारीही बनविले आहे. यादव, गैरयादव व दलित या त्रिकोणातून उत्तर प्रदेशाची सुटका करण्यासाठी एखादा ब्राह्मण चेहरा देण्याचा निर्णय मोदींनी केला तर शर्मांचे नाव त्यासाठी फिट्ट बसते. राज्याचे प्रदेशाध्यक्ष केशवप्रसाद मौर्य हेही शर्यतीत आहेत.

गोव्यात भाजपची कामगिरी वाईट झाली तरी सरकार बनविण्याबाबत पक्षनेतृत्व आत्मविश्‍वास दाखविते. गोवा हे मुळातच राजकीयदृष्ट्या अस्थिर राज्य मानले जाते. आता तर तेथे त्रिशंकू विधानसभेची परिस्थिती उद्‌भवली आहे. लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यासह तब्बल पाच मंत्र्यांना मतदारांनी घरी पाठविले आहे. अशा स्थितीत गोव्यातील राजकीय कसरत सांभाळण्यासाठी अनुभवी नेताच हवा व ही बाब दिल्लीला कंटाळलेले संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या पथ्यावर पडणारी मानली जाते. पर्रीकर गोव्यात अजूनही लोकप्रियतेत नंबर वन आहेत. त्यामुळे त्यांनी तेथील निसरड्या परिस्थितीत सरकार बनविण्याचा व चालवून दाखविण्याचा विडा उचलला तर मोदींसमोर तोही पर्याय असेल.

उत्तराखंडात नवा चेहरा?
उत्तराखंडमध्येही भाजपकडे नव्या चेहऱ्यावाचून पर्याय नसल्याचे चित्र आहे. बी. सी. खंडुरी, भगतसिंह कोशियारी, रमेश पोखरियाल 'निशंक', विजय बहुगुणा असे चार चार माजी मुख्यमंत्री भाजपकडे असले तरी मोदींचा कल नवीन चेहऱ्यांकडे असल्याचे सांगितले जाते. प्रदेशाध्यक्ष अजय भट्ट यांच्यासारखी नावे त्यासाठी घेतली जातात.