β केवळ हुतात्म्यांची मोजदादच करायची का?

army Martyrs
army Martyrs

उरी येथील सैन्याच्या मुख्यालयावर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात 18 जवान हुतात्मे झाले व अन्य काही जखमी झाले. ही घटना अत्यंत दु:खद, तापदायक व तेवढीच संतापजनक आहे. याच वर्षी फेब्रुवारीपासून आजपर्यंत विविध ठिकाणी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात 50 जवान हुतात्मा झाले तर 25 जण जखमी झाले. आता किती दिवस भारताने हुतात्म्यांमी मोजदादच करत राहावयाची? आता दहशतवाद्यांविरुद्ध तसेच त्यांना मदत करणाऱ्यांविरुद्ध कठोर शब्दांची नव्हे तर कठोर कारवाईची गरज आहे. 

हल्ल्यामागे पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जबाबदार आहे. हल्लेखोरांकडून पाकिस्तानी शस्त्रास्त्रे व सामान मिळाले. पाकिस्तानच्या सहभागाचे पुरावे मिळाले. हल्ल्यासंदर्भात अधिक सखोल चौकशी सुरू आहे. हे सर्व पुरावे पाकिस्तानला सादर केले जातील व पाकिस्तान नेहमीप्रमाणेच नाकारेल. बस आता बस झाल्या या साऱ्या गोष्टी. राजकीय पटलावर पाकिस्तानला दोषी ठरविण्यासाठी पुरावे गोळा करणे आवश्‍यक आहे. त्याप्रमाणे पुरावे गोळा करावेतही. मात्र आता जनतेला गरज आहे ती हल्लेखोरांना तसेच त्यांना प्रोत्साहन आणि सहकार्य करणाऱ्यांवर जरब बसेल अशा दृष्य कारवाईची. 

पंतप्रधान म्हणतात "हमले के दोषावरो को बख्शा नही जाएगा‘ म्हणजे नेमके काय? हल्लेखोरांना ठार करण्यात येईल? कि त्यांना प्रोत्साहन, सहकार्य व उत्तेजन देणाऱ्या सर्वच घटकावर कारवाई करण्यात येईल. दहशतवाद्यांनी कशी, कधी व किती दिवसांपासून हल्ल्याची योजना आखली व पूर्ण केली. या माहितीपेक्षा आजवर आमच्या शहीद झालेल्या जवानांच्या बदल्यात पाकिस्तानला व पाकिस्तानातील दहशतवादी सलाउद्दीन, मसुद अजहर व अन्य संबंधित दहशतवाद्यांना काय परिणाम भोगावे लागले हे ऐकण्याची उत्सुकता सर्व भारतीयांना व शहीदांच्या परिजनांना आहे. त्यासाठी सर्वांचे कान असुसले आहेत. म्यानमारमध्ये जाऊन भारतीय सैन्याने हल्लेखोरांचे तळ उध्वस्त केले. त्याला म्यानमार सरकारचेही सहकार्य लाभले होते. पाकिस्तानबाबत ते शक्‍य होईल का? तसे करावे अशी सर्वच भारतीयांची इच्छा आहे. ती कारवाई मुहतोड जबाब ठरेल. मात्र चीन पाकची मैत्री लक्षात घेता भारताकडून अशी कारवाई होणे अशक्‍य दिसते. मात्र अशी कारवाई झाल्यास ती निश्‍चितच कठोर कणखर व शहीदांना व त्याच्या परिजनांना न्याय देणारी ठरेल. अभिमानास्पद ठरेल. 

गृहमंत्री, सैन्याचे अधिकारी, पंतप्रधान यांच्या बैठकीत कारवाईची योजना ठरेलही. काही योजनांची जाहीर वाच्यता करावयाची नसते हे ही बरोबरच आहे. मात्र आज सर्व जनता योजना कोणतीही करा; मात्र त्याचे पाकिस्तान व तेथील भारतविरोधी दहशतवाद्यांवर झालेले गंभीर वेदनादायक दृष्य परिणाम त्वरित दिसले पाहिजेत. ही सर्व भारतीयांची तीव्र इच्छा आहे. 

सोबतच संभाव्य हल्ले लक्षात गेता अनेक महत्त्वाची ठिकाणे व व्यक्ती यांच्यासाठी केलेल्या सुरक्षा योजनांची व उपायाची दुरदर्शनवरील जाहीर चर्चा ताबडतोब बंद कराव्या. आपण जनतेला विशेष माहिती देतो आहोत अशा अतिउत्साहापोटी आपण स्वत:च ही माहिती शत्रुपर्यंत पोहोचवतो ही साधी बाब या अतिउत्साही माध्यमांना व त्यांना माहिती देणाऱ्यांना कळत नाही का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com