'गब्बरसिंग टॅक्‍स' देशावर लादू देणार नाही: राहुल गांधी

वृत्तसंस्था
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

जीएसटी हा 'एक देश एक कर' नसून, सुमारे 40 ते 45 टक्के वस्तू व सेवा त्याच्या कक्षेतून बाहेर ठेवण्यात आल्या आहेत. 
- अभिषेक मनू सिंघवी, कॉंग्रेस प्रवक्ता 

नवी दिल्ली : आपला पक्ष मोदी सरकारला 'गब्बरसिंग टॅक्‍स' अर्थात जीएसटी देशावर लादू देणार नाही, असा इशारा कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज ट्‌विटरद्वारे दिला. केंद्र सरकारने आपला अहंकारपणा सोडून यात बदल करावेत, असेही राहुल यांनी म्हटले आहे. 

देशातील लहान आणि मध्यम स्वरुपाच्या व्यावसायिकांवर जीएसटी थोप सरकारला त्यांचा कणा मोडू देणार नाही. या निर्णयामुळे अनौपचारीक क्षेत्राला मोठा फटका बसला असून, असंख्य रोजगार हिरावले गेल्याचा आरोपही राहुल यांनी केला. गुवाहाटी येथे झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीच्या पार्श्वभूमिवर त्यांनी हे ट्‌विट केले आहे. 

''केंद्राने देशाला एक साधा व सोपा कर द्यावा, नागरीकांना शाब्दीक कौशल्याद्वारे गुंतवून त्यांचा वेळ वाया घालवू नये.'' असा सल्लाही राहुल यांनी सरकारला दिला आहे. सरकारने आपली अकार्यक्षमता कबूल करत अहंकारी वृत्ती सोडावी आणि देशातील नागरिकांचे म्हणणे ऐकूण घ्यावे, असा टोलाही त्यांनी लगावला. 

जीएसटी हा 'एक देश एक कर' नसून, सुमारे 40 ते 45 टक्के वस्तू व सेवा त्याच्या कक्षेतून बाहेर ठेवण्यात आल्या आहेत. 
- अभिषेक मनू सिंघवी, कॉंग्रेस प्रवक्ता