देशद्रोही मुलाचा मृतदेह स्वीकारणार नाही

वृत्तसंस्था
बुधवार, 8 मार्च 2017

भारत दीर्घकाळ दहशतवादी कारवायांचा सामना करत आहे आणि आपल्या गुप्तचर संस्थाही अतिशय दक्ष आहेत. लखनौसारख्या घटनांचा सामना करण्यास आम्ही सक्षम आहोत.
- सुभाष भामरे, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री

लखनौमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्याच्या पित्याची भूमिका

कानपूर: लखनौमध्ये पोलिस चकमकीत खात्मा झालेल्या संशयित दहशतवाद्याचा मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांनी नकार दिला आहे. एक देशद्रोही माझा मुलगा असूच शकत नाही, आम्ही त्याचा मृतदेह स्वीकारणार नाही, असे दशहतवादी सैफुल्लाचे वडील सरताज यांनी म्हटले आहे.

लखनौच्या वेशीवर असलेल्या "हाजी कॉलनी' नावाच्या दाट वस्तीतील एका घरात मध्य प्रदेशातील रेल्वे स्फोटाशी संबंधित सैफुल्ला हा दहशतवादी दडून बसल्याची माहिती राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) मिळाली होती. एटीएसच्या पथकाने त्या घराला वेढा घालून घरात दडून बसलेल्या सैफुल्लाला शरण येण्यास सांगितले; पण शरण येण्यापेक्षा मृत्यू स्वीकारीन असे सांगत सैफुल्लाने पोलिसांवरच गोळीबार केला. तब्बल 12 तासांच्या चकमकीनंतर सैफुल्लाचा खात्मा झाला. तो इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा संशय आहे.
सैफुल्ला चकमकीत मारला गेल्याने आम्हाला सर्वांना धक्काच बसला. तो नेहमी चांगले वागायचा. दिवसातून पाच वेळा नमाज अदा करायचा. तो दहशतवादी कारवायांमध्ये असेल असे आम्हाला कधीच वाटले नव्हते, असे त्याच्या नातेवाइकांनी सांगितले. तर, सैफुल्लाच्या वडिलांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. सैफुल्लाला मी एक- दोन महिन्यांपूर्वी काम करत नसल्याने मारले होते. आठवडाभरापूर्वीच त्याने मला सौदीला जात असल्याचे सांगितले होते. सैफुल्लाने जे केले ते देशहितामध्ये नाही. आम्ही देशद्रोह्याचा मृतदेह स्वीकारणार नाही, असे त्याच्या वडिलांनी सांगितले.

दरम्यान, मध्य प्रदेश आणि कानपूरमधून अटक करण्यात आलेले संशयित दहशतवादी दानिश, इमरान आणि फैजल यांच्या वडिलांनी आपली मुले निर्दोष असल्याचे सांगत त्यांचा बचाव केला आहे.

सैफुल्लाचा भोपाळ- उज्जैन रेल्वे स्फोटाशी संबंध असल्याचे तपासातून समोर आले होते. मंगळवारी भोपाळ- उज्जैन पॅसेंजरमध्ये झालेल्या स्फोटात 10 जण जखमी झाले होते. हा स्फोट इसिस या दहशतवादी संघटनेने घडवल्याचा दावा मध्य प्रदेश पोलिसांनी केला आहे.

सैफुल्ला हा कानपूरचा रहिवासी असून ठाकूरगंजमधील ज्या घरात सैफुल्ला दडून बसला होता त्या घरातून पोलिसांना इसिसचे झेंडे आणि रेल्वे रुळांचा नकाशा सापडला होता. याशिवाय मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही पोलिसांनी या घरातून जप्त केला आहे.