नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या निवडणूक चिन्हाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. 'सायकल' या निवडणूक चिन्हावर दावे करणाऱ्या मुलायमसिंह यादव गट आणि अखिलेश यादव गटाची बाजू आज निवडणूक आयोगाने ऐकून घेतली. यानंतर आयोगाने निकाल राखून ठेवला आहे. मात्र दोन्ही गटांच्या या संघर्षामध्ये पक्षाचे चिन्ह गोठवले जाऊ शकते, असे संकेत मिळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर यादव पिता-पुत्रांमध्ये तह होण्याची आणि एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता बळावल्याचे बोलले जाते.
निवडणूक आयोगासमोर आज झालेल्या सुनावणीदरम्यान मुलायमसिंह यादव, शिवपाल यादव हजर होते, तर अखिलेश गटातर्फे रामगोपाल यादव, नरेश अग्रवाल, किरणमयी नंदा आणि इतर नेते उपस्थित होते. अखिलेश गटातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली, तर मुलायमसिंह गटातर्फे वरिष्ठ वकील मोहन प्रशारण यांनी बाजू मांडली. समाजवादी पक्षात फूट नसल्याचे एकीकडे नेते म्हणतात आणि दुसरीकडे निवडणूक चिन्ह आपल्याच गटाला मिळावे, अशी मागणी करतात. याचाच अर्थ समाजवादी पक्षात फूट असल्याचे निरीक्षण निवडणूक आयोगाने या वेळी नोंदवले. त्यानंतर निकाल राखीव ठेवला आहे. यापुढे सुनावणी होणार नसून, आयोगाकडून केव्हाही निकाल जाहीर केला जाऊ शकतो.
या साऱ्या पार्श्वभूमीवर यादव पिता-पुत्रांची चिंता वाढली असल्याने निवडणुकीपुरती का होईना; हातमिळवणी कशी करता येईल यासाठीच्या प्रयत्नांना सुरवात झाल्याचे बोलले जाते. शिवपाल यादव आणि अमरसिंह यांचा मुलायमसिंह यांच्यावर 'काहीही झाले तरी तह नको' असा दबाव आहे, तर अखिलेश यादव यांच्या गटातले रामगोपाल यादवही दुसऱ्या गटाशी तह करण्याच्या विरोधात आहेत.
दोघांनाही वास्तवाची जाणीव
या यादवीमध्ये खुद्द मुलायमसिंह यादव आणि अखिलेश यादव यांनी एकमेकांना नरमाईच्या भूमिकेचे संकेत दिले आहेत. पक्षाच्या बहुतांश आमदारांनी अखिलेश यांच्यामागे पाठबळ उभे केल्याने समाजवादी पक्षावर नियंत्रण उरलेले नाही, याची जाणीव मुलायमसिंह यादव यांना झाली आहे. पक्षामध्ये आपण वर्चस्व निर्माण केले तरीही अजूनही कायदेशीररीत्या मुलायमसिंहच अध्यक्ष असल्याने तांत्रिक कारणास्तव निवडणूक चिन्ह मिळाले नाही, तर राजकारणाचा डाव उधळला जाऊ शकतो, याची जाणीव अखिलेश यादव यांना आहे. त्यामुळे निवडणूक चिन्हावरील ताब्यासाठी दोन्ही गटांची आयोगापुढे लढाई सुरू असली तरीही यादव पिता-पुत्रांकडून एकमेकांना नरमाईचे फिलर पाठविले जात असल्याचे चित्र आहे.
|