'फायरब्रॅंड' नेते योगी आदित्यनाथ आता 'यूपी'चे मुख्यमंत्री

वृत्तसंस्था
शनिवार, 18 मार्च 2017

योगी आदित्यनाथ हे 1998 पासून गोरखपूरचे खासदार आहेत. संसदेतही 'आक्रमक' आणि 'फायरब्रँड' खासदार म्हणून त्यांची ओळख आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजप सरकारचा शपथविधी 19 मार्च रोजी होणार आहे.

लखनौ : दणदणीत बहुमत घेऊन सत्तेत दाखल झालेल्या भारतीय जनता पक्षाने (भाजप) मुख्यमंत्री म्हणून 'फायरब्रॅंड' नेते योगी आदित्यनाथ यांची निवड केली. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी केशव प्रसाद मौर्य, दिनेश शर्मा आणि मनोज सिन्हा यांच्या नावांची कालपर्यंत जोरदार चर्चा होती. मात्र, सर्व राजकीय तज्ज्ञांचे अंदाज धुडकावत भाजपने योगी आदित्यनाथ यांची नियुक्ती केली. सत्तेचा समतोल साधण्यासाठी भाजपने दोन उपमुख्यमंत्र्यांचीही नियुक्ती केली. दिनेश शर्मा आणि केशव प्रसाद मौर्य यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये भाजपने 403 पैकी 324 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळविले. त्या दिवसापासूनच 'मुख्यमंत्री कोण' या चर्चेला उधाण आले होते. पुढील लोकसभा निवडणूक 2019 मध्ये होणार आहे. यासाठी अद्याप जवळपास दोन वर्षे शिल्लक आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला उत्तर प्रदेशमधील 80 पैकी 72 जागांवर विजय मिळाला होता. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठीही उत्तर प्रदेश हे भाजपच्या व्यूहरचनेतील महत्त्वाचे राज्य असणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर, उत्तर प्रदेशमध्ये भाजपला लोकप्रिय आणि धडाडीने काम करणारा चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी हवा होता.

योगी आदित्यनाथ हे 1998 पासून गोरखपूरचे खासदार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये भाजप सरकारचा शपथविधी 19 मार्च रोजी होणार आहे.

मुख्यमंत्री निवडण्यासाठी भाजपने आज (शनिवार) पक्षाच्या आमदारांची बैठक बोलाविली होती. शनिवारी दुपारनंतर योगी आदित्यनाथ यांच्या नावाची चर्चा अधिक जोरात सुरू झाली. योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर ते लखनौमध्ये दाखल झाले. सायंकाळी पाचच्या सुमारास योगी आदित्यनाथ आणि केशवप्रसाद मौर्य यांनी भाजपच्या राज्य निरीक्षकांची भेट घेतली. 'सीएनएन-न्यूज18'ने दुपारी दिलेल्या वृत्तानुसार, सत्तेचे समीकरण साधण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये दोन उप-मुख्यमंत्री असण्याचीही चर्चा होती.

भाजपची बैठक असलेल्या 'लोक भवन'च्या बाहेर मौर्य आणि आदित्यनाथ यांच्या समर्थकांमध्ये घोषणाबाजीचे युद्धही काही काळ रंगले होते. या पार्श्‍वभूमीवर वेंकय्या नायडू यांनी ज्येष्ठ नेते कलराज मिश्रा यांना बैठकीस उपस्थित राहण्याची विनंती केली. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वेंकय्या नायडू यांनी मुख्यमंत्रीपदासाठीच्या उमेदवारांशी चर्चा केली. यानंतर पावणेसहाच्या सुमारास आमदारांच्या बैठकीस सुरवात झाली. कालपर्यंत मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सर्वांत आघाडीवर असलेल्या मनोज सिन्हांनी या बैठकीपासून दूर राहणेच पसंत केले.

Web Title: Yogi Adityanath to be UP CM; UP election Narendra Modi Amit Shah