"योगी आदित्यनाथ' हाच मोदींचा नवा भारत: ओवैसी

पीटीआय
रविवार, 19 मार्च 2017

मोदी व भाजपचे हेच नव्या भारताचे स्वप्न आहे. मात्र यामुळे मला आश्‍चर्य वाटलेले नाही. आता राज्यात आपल्याला "इतरांना' वगळणारे विकासाचे प्रारुप पहावयास मिळेल

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्रिपदी योगी आदित्यनाथ यांची झालेली निवड हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "नव्या भारताच्या स्वप्नाचा'च एक भाग असल्याची टीका एआयएमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे.

योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्याने आजिबात आश्‍चर्य वाटले नसल्याचे सांगत योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होणे हा भारताच्या पुरातन "गंगा जमुना तेहझीब (संस्कृती)'वर झालेला हल्लाच असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

"मोदी व भाजपचे हेच नव्या भारताचे स्वप्न आहे. मात्र यामुळे मला आश्‍चर्य वाटलेले नाही. समाजवादी पक्षाने सत्तेत असताना मुस्लिमांची फसवणूकच केली. आणि आता राज्यात आपल्याला "इतरांना' वगळणारे विकासाचे प्रारुप पहावयास मिळेल. याच विकासाची चर्चा सतत त्यांच्याकडून होत असते,'' असे ओवैसी म्हणाले.

योगी आदित्यनाथ यांची राजकीय कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे. प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान याची जमात उद दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या असलेल्या हफीझ सईद याच्याशी केलेली तुलना असो, वा सूर्य नमस्कार घालण्याची इच्छा नसलेल्या नागरिकांनी भारत सोडून जावा, अशा आशयाचे व्यक्त केलेले मत असो; योगी आदित्यनाथ हे विविध राजकीय वादांत सातत्याने केंद्रस्थानी दिसून आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर, त्यांच्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी झालेल्या निवडीमुळे संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.