कायदा-सुव्यवस्थेत ढिलेपणा नको : योगी आदित्यनाथ

वृत्तसंस्था
सोमवार, 20 मार्च 2017

आम्ही राज्याच्या जनतेच्या उन्नतीसाठी पूर्ण क्षमतेने काम करणार आहोत. आम्ही करत असलेल्या कामाचे प्रत्यक्ष परिणाम जनतेला दिसतील, याचीही काळजी आम्ही घेऊ. 
- दिनेश शर्मा, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री 

लखनौ : बहुजन समाज पक्षाच्या (बसप) ज्येष्ठ नेत्याची हत्या झाल्यानंतर उत्तर प्रदेशचे नवनियुक्त मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज (सोमवार) 'कायदा-सुव्यवस्थेसंदर्भात कोणताही ढिलेपणा खपवून घेतला जाणार नाही, याची काळजी घ्या' असे राज्याचे पोलिस महासंचालकांना सांगितले. 

अलाहाबादमध्ये बसपचे ज्येष्ठ नेते महंमद शमी यांची काल (रविवार) रात्री गोळ्या घालून हत्या झाली. त्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलिस महासंचालक जावेद अहमद यांच्याशी संवाद साधला. शमी यांच्या हत्येनंतर मुख्यमंत्र्यांनी कायदा-सुव्यवस्थेविषयी चिंता व्यक्त केली. राज्यात सुरक्षित वातावरण निर्माण करणे आणि कायदा सुव्यवस्था पुनर्प्रस्थापित करणे, हे राज्य सरकारचे मुख्य ध्येय आहे असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज राज्य सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक घेतली. 'सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भाजपचे निवडणुकीपूर्वीचे 'संकल्प पत्र' वाचावे; जेणेकरून त्यातील घोषणांवर काम करणे शक्‍य होईल' असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला. उत्तर प्रदेशचे दोन्ही उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा हेदेखील बैठकीस उपस्थित होते. 

आम्ही राज्याच्या जनतेच्या उन्नतीसाठी पूर्ण क्षमतेने काम करणार आहोत. आम्ही करत असलेल्या कामाचे प्रत्यक्ष परिणाम जनतेला दिसतील, याचीही काळजी आम्ही घेऊ. 
- दिनेश शर्मा, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री 

Web Title: Yogi Adityanath directs UP DGP to ensure Law and Order in State