गायीच्या नावे कायदा हातात घेऊ नका : योगी आदित्यनाथ

वृत्तसंस्था
शनिवार, 1 जुलै 2017

गोरक्षणाच्या नावाखाली उत्तर प्रदेशसह देशभरात होत असलेल्या काही हिंसक प्रकारांच्या पार्श्‍वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गायीच्या नावे नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन केले आहे.

लखनौ (उत्तर प्रदेश) : गोरक्षणाच्या नावाखाली उत्तर प्रदेशसह देशभरात होत असलेल्या काही हिंसक प्रकारांच्या पार्श्‍वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गायीच्या नावे नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन केले आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान आदित्यनाथ बोलत होते. ते म्हणाले, "राष्ट्रीय हरित लवाद (एनजीटी) आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे राज्यात (उत्तर प्रदेश) पालन करण्यात येत आहे. आम्ही कत्तलखाने बंद करत नाहीत. मात्र जे लोक सरकारच्या सूचनांचे पालन करत नाहीत त्यांच्याविरुद्ध कारवाई करत आहोत. नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये. गायीच्या तस्करीचा प्रकार आढळला तर त्यांनी त्याबाबत केवळ प्रशासनाला कळवावे.' अयोध्येतील राममंदिराच्या प्रश्‍नावर बोलताना ते म्हणाले, "राममंदिराचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाप्रमाणेच मलाही असेच वाटते की हे प्रकरण परस्पर सामंजस्याने सोडवावे. आम्ही अयोध्येतील नागरिकांमध्ये बंधुभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. मागील सरकारप्रमाणे आम्ही पक्षपातीपणा करत नाहीत.'

शेतकऱ्यांची कर्जमाफी म्हणजे त्यांना भेट असल्याचेही आदित्यनाथ म्हणाले. "आम्ही राज्यातील गुंतवणूक वाढविण्याकडे भर देत असून राज्यात गुंतवणूक करण्यासाठी अनेक कंपन्यांनी स्वारस्य दाखविले आहे', असेही ते म्हणाले.