योगी आदित्यनाथ अॅक्टिव्ह; 'अँटी रोमिओ' दल स्थापन

वृत्तसंस्था
बुधवार, 22 मार्च 2017

महिलांवर केली जात असलेली शेरेबाजी आणि छळणूक रोखण्यासाठी अँटी-रोमिओ दल स्थापन केले आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यात असे एक पथक असेल. महिलांना त्रास देणाऱ्यांवर 'गुंडा ऍक्‍ट'नुसार कारवाई केली जाईल

लखनौ : उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दोनच दिवसांत योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार पोलिसांनी 'अँटी-रोमिओ' कृती दलांची स्थापना केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान 'राज्यातील महिलांची सुरक्षा' हा विषय भाजपच्या अजेंड्यावर होता. 

मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर लगेचच पोलिस महासंचालकांना यासंदर्भात सूचना केली होती. त्यानुसार, पोलिसांनी आता 'अँटी-रोमिओ' कृती दल सुरू केले आहे. शाळा, महाविद्यालयांबाहेर पोलिसांनी गस्त घालण्यासही सुरवात केली आहे. झाशीमध्ये मुलींची छेड काढणाऱ्या तीन तरुणांना पोलिसांनी पकडले. मीरतमध्ये मुलींच्या शाळा आणि महाविद्यालयांसमोर फिरणाऱ्या तरुणांची पोलिसांनी चौकशी केली. 

मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी सोमवारी महासंचालक जावेद अहमद यांची भेट घेतली होती. 'राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती सुधारण्यासाठी आराखडा मांडा,' असे आदित्यनाथ यांनी अहमद यांना सांगितले होते. 'सार्वजनिक ठिकाणी गुंडगिरी नष्ट करणे आणि महिलांसाठी सुरक्षित वातावरण तयार करणे, याला प्राधान्य दिले आहे,' असे अहमद यांनी सांगितले होते. त्यानुसार, आता शॉपिंग मॉल, शाळा, महाविद्यालये, खासगी क्‍लासेस यांच्या परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्याच्या सूचना सर्व पोलिस ठाण्यांना करण्यात आल्या. 

'महिलांवर केली जात असलेली शेरेबाजी आणि छळणूक रोखण्यासाठी अँटी-रोमिओ दल स्थापन केले आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यात असे एक पथक असेल. महिलांना त्रास देणाऱ्यांवर 'गुंडा ऍक्‍ट'नुसार कारवाई केली जाईल,' असे वरिष्ठ पोलिस अधिकारी ए. सतीश गणेश यांनी सांगितले. 

Web Title: Yogi Adityanath orders to set up Anti-Romeo squads to stop eve teasing