योगी सरकारचे पहिल्या दिवसापासून काम सुरू

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 मार्च 2017

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कामाचा धडाका सुरू केला आहे. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याबाबत विचारविनीमय, कत्तलखान्यांवर कारवाई, सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा आदी कामे त्यांनी पहिल्याच दिवशी केली.

लखनौ (उत्तर प्रदेश) - उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कामाचा धडाका सुरू केला आहे. अधिकाऱ्यांसोबत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याबाबत विचारविनीमय, कत्तलखान्यांवर कारवाईचे निर्देश आदी कामे त्यांनी पहिल्याच दिवशी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारतीय जनता पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत रविवारी योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर सोमवार हा त्यांच्या कामाचा पहिला दिवस होता. पहिल्या दिवशीच्या आदित्यनाथ यांनी राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत अधिकाऱ्यांसोबतच्या एक तासाच्या बैठकीत चर्चा केली. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात म्हटल्याप्रमाणे दिल्याप्रमाणे आदित्यनाथ यांनी राज्यातील कत्तलखान्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

राज्यातील अधिकाऱ्यांनी त्यांची संपत्ती जाहीर करावी आणि भरती प्रक्रिया पारदर्शकपणे कोणत्याही राजकीय दबावाशिवाय करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. बहुजन समाज पक्षाच्या नेत्याची अलाहाबादमध्ये नुकतीच हत्या झाली. यावर चिंता व्यक्त करत राज्यातील पोलिस अधिक चांगले काम कसे करू शकतील, याबाबत 15 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश आदित्यनाथयांनी राज्याच्या पोलिस प्रमुखांना दिले.