योगी, 'यूपी'चे गुंड आम्ही पोसायचे का?

टीम ई सकाळ
बुधवार, 29 मार्च 2017

"मुंबई-दिल्लीसारखी शहरे हे भोग याआधीच भोगत आहेत, त्यात आणखी नवी भर कशाला! तुमचे गुंड तुम्हीच सांभाळा. त्यांना कायद्याने मोडून काढा नाहीतर त्यांचे मनपरिवर्तन करा. हा संपूर्णपणे त्या त्या राज्याचा प्रश्न आहे," असे 'सामना'च्या अग्रलेखात म्हटले आहे.

मुंबई : गुंडांना त्यांच्याच राज्यात जेरबंद करावे. गुंडांना सुधारण्यासाठी त्यांना वाटल्यास अयोध्येच्या कारसेवेस लावावे, पण उत्तर प्रदेश सोडून गुंडांनी इतर राज्यांत जाण्याचे फर्मान सोडून देशाच्या पोटात भीतीचा गोळा आणू नये, असे शिवसेनेने म्हटले आहे. 

योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या राज्यातील गुंडांना दम भरला आहे. गुंडांनी सुधारावे, नाहीतर उत्तर प्रदेश सोडून चालते व्हावे, असे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी जाहीर केले आहे. योगी आदित्यनाथ यांच्या या विधानावर सामनामधून टीका केली आहे. 

"मुंबई-दिल्लीसारखी शहरे हे भोग याआधीच भोगत आहेत, त्यात आणखी नवी भर कशाला! तुमचे गुंड तुम्हीच सांभाळा. त्यांना कायद्याने मोडून काढा नाहीतर त्यांचे मनपरिवर्तन करा. हा संपूर्णपणे त्या त्या राज्याचा प्रश्न आहे," असे 'सामना'च्या अग्रलेखात म्हटले आहे.

'आम्ही समस्त देशवासीयांचीच भावना व्यक्त केली आहे. योगीजी भावना समजून घेतील,' अशी अपेक्षा व्यक्त करताना 'सामना'ने म्हटले आहे की, 'कायद्याचे राज्य सर्वात जास्त कुठे असायला हवे ते फक्त योगींच्या उत्तर प्रदेशात. देशाचे गृहमंत्री व पंतप्रधान याच राज्याचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे येथे गुंडांवर वचक हवाच. हा वचक ठेवण्यासाठी योगींना कठोर व्हावे लागेल.'

गोहत्या करणाऱयांचे हात-पाय तोडू अशी धमकी भाजप आमदारांनी दिलीच आहे. मग गुंडांच्याच बाबतीत इतका हळुवारपणा का? ‘‘गुंडगिरी कराल तर हातपाय तोडू, याद राखा!’’ असा जोरदार दम देऊन गुंडांची मस्ती व माज उतरवायला हवा होता, अशी परखड टीका शिवसेनेने केली आहे. 

Web Title: yogi, control goons from uttar pradesh