कत्तलखाने बंद करण्याचे योगींचे आदेश

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 मार्च 2017

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीरनाम्यात म्हटल्याप्रमाणे आपला शब्द पाळत आज उत्तर प्रदेशातील सर्व कत्तलखाने बंद करण्याचे आदेश दिले.

लखनौ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीरनाम्यात म्हटल्याप्रमाणे आपला शब्द पाळत आज उत्तर प्रदेशातील सर्व कत्तलखाने बंद करण्याचे आदेश दिले. याचबरोबर महामार्गावरील लूटमारीचे प्रकार थांबविण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पेट्रोलिंगवर लक्ष द्यावे आणि सरकारी बाबूंनी कार्यालयीन कामकाजावेळी पान व तंबाखू खाऊ नये, असेही त्यांनी आज सांगितले. तसेच गोरखपूर ते मेरठपर्यंत रोड रोमिओंविरोधात पथके उभारून महिलांच्या सुरक्षेकडेही लक्ष द्यावे असे त्यांनी सांगितले.

राज्यातील कत्तलखाने बंद करण्यासाठी ऍक्‍शन प्लॅन तयार करण्याच्या सूचना योगी आदित्यनाथ यांनी आज पोलिसांना दिल्या; त्याचप्रमाणे गोमातेची होणाऱ्या तस्करीवरही संपूर्ण बंदी घालावी आणि याबद्दल कोणतीही सबब खपवून घेतली जाणार नाही, असेही ते म्हणाले. दरम्यान, लखनौ महानगरपालिकेने या आदेशाचे पालन करत येथील नऊ मांस दुकानांना टाळे ठोकले आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात अवैध कत्तलखान्यांवर बंदी आणू, असे म्हटले असल्याने त्यांच्यावरच कारवाईची शक्‍यता व्यक्त होत आहे. येथे होणाऱ्या गोमातेच्या तस्करीमुळे डेअरी उद्योगाचा विकास होत नसल्याचे मतही भाजपने व्यक्त केले आहे. आज योगी आदित्यनाथ यांनी याबाबत पोलिसांना कडक कारवाईचे आदेश देत समाज-विघातक शक्तींविरुद्धही कठोर राहावे, असे म्हटले आहे.

वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत आदित्यनाथ यांनी कायदा आणि सुव्यवस्थेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे सांगत महामार्गावरील पेट्रोलिंगमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याबाबत सांगितले. पक्षाचे प्रवक्ते श्रीकांत शर्मा यांनी ही माहिती देताना आदित्यनाथ यांनी पुढील पाच वर्षांसाठीचा आराखडाही तयार करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले.

पान व तंबाखूवरही बंदी
शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि सरकारी इमारतींमध्ये पान आणि तंबाखूसारखे पदार्थ खाण्यासही योगी आदित्यनाथ यांनी आज बंदी घालण्याचे आदेश दिले. सचिवालयाला दिलेल्या पहिल्याच भेटीत त्यांनी सरकारी बाबूंनी कार्यालयीन कामाच्या वेळेत पान व तंबाखू खाणे बंद करावे असे म्हटले. लालबहादूर शास्त्री भवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीत मुख्यमंत्र्यांचे घर आणि अन्य महत्त्वाची कार्यालये आहेत; परंतु या इमारतीच्या भिंती पिचकाऱ्यांनी रंगलेल्या दिसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत हे आदेश दिले. त्याचप्रमाणे सरकारी कार्यालयातील वातावरण स्वच्छ व आरोगी असावे, यासाठी प्लॅस्टिकच्या वापरावरही त्यांनी प्रतिबंध घातला. या वेळी त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना स्वच्छतेची शपथही दिली.