तुम्ही गायींना वाचवता, पण महिलांना नाही- जया बच्चन

वृत्तसंस्था
बुधवार, 12 एप्रिल 2017

पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा शिरच्छेद करणाऱ्याला अकरा लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे भारतीय जनता युवा मोर्चाच्या नेत्याने जाहीर केले आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यसभेच्या खासदार जया बच्चन यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली - पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा शिरच्छेद करणाऱ्याला अकरा लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे भारतीय जनता युवा मोर्चाच्या नेत्याने जाहीर केले आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यसभेच्या खासदार जया बच्चन यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

भारतीय जनता युवा मोर्चाचे नेते योगेश वार्ष्णेय यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, "जे कोणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे शिर कापेल आणि घेऊन येईल, त्याला मी अकरा लाख रुपयांचे बक्षीस देईल.' यावरून भाजपवर टीका करण्यात येत आहे.

आज तृणमूल काँग्रेसचे खासदार सुखेंदू शेखर यांनी हा मुद्दा राज्यसभेतही उपस्थित केला. ते म्हणाले, "पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांना राक्षस असे संबोधण्यात आले आहे. पश्‍चिम बंगालमध्ये धर्माच्या नावावर दहशतवाद पसरवण्यात येत आहे. या प्रकाराचा निषेध करायला हवा.' खासदार जया बच्चन म्हणाल्या, "तुम्ही गायींना वाचवता. पण महिलांना नाही. महिलांचा छळ करण्यात येत आहे. आज महिलांना खूप असुरक्षित वाटत आहे. एखाद्या महिलेविरुद्ध कोणीही असे बोलण्याची हिंमत कशी करतो? तुम्ही अशा प्रकारांना पाठिंबा देत आहात का?'