जातीचा दबाव नव्हे; काम दाखवा - नरेंद्र मोदी

जातीचा दबाव नव्हे; काम दाखवा - नरेंद्र मोदी

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात निवडणूक समीकरणांबरोबरच "जातीचा दबाव नव्हे, तर काम दाखवा व मंत्रिपद मिळवा,‘ हा मंत्रही अमलात आणण्याचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याची माहिती आहे. प्रकाश जावडेकर व नव्या 19 मंत्र्यांमध्ये तब्बल 15 असे चेहरे आहेत जे कधीही "लाइमलाइट‘मध्ये किंवा राज्यातील बड्या नेत्यांच्या निकट राहिलेले नाहीत व त्यांना आता थेट केंद्रीय मंत्रिपद देऊन नवे क्षेत्र खुले केले गेले आहे. मंत्रिमंडळाप्रमाणेच या विस्तारातही राज्यसभेचा वरचष्मा दिसतो. 

मात्र मंत्र्यांची संख्या 79 वर पोचल्याने "मिनिमम गव्हर्न्मेंट-मॅक्‍झिमम गव्हर्नन्स‘ या घोषणेनुसार मंत्र्यांची संख्या कमी ठेवण्याच्या धोरणावर मोदी यांना दोन वर्षांतच पाणी सोडावे लागल्याचेही यातून दिसते. जावडेकर, रामदास आठवले, एस. एस. अहलुवालिया, अनिल दवे, अर्जुनराम मेघवाल व एम. जे. अकबर हीच नावे सार्वजनिकरीत्या प्रसिद्ध आहेत. राजस्थानातील तीनपैकी दोन नावे मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्या विरोधी गटातील दिसतात. 

काही मंत्र्यांची प्रभावक्षेत्रे अशी - मनसुख मंडाविया-कृषी, पुरुषोत्तम रूपाला व अहलुवालिया-संसदीय कामकाज, पी. पी. चौधरी-विधिज्ञ, अकबर-धोरण आखणी, दवे व मेघवाल-समाजकार्य व प्रशासन आणि सी. आर. चौधरी-शिक्षण. 

जातीधर्माच्या कार्डापेक्षाही तुमचे काम हेच महत्त्वाचे ठरेल, असा खणखणीत इशारा मंत्र्यांना देणाऱ्या मोदी यांनी जूनअखेर मंत्र्यांची झाडाझडती घेतली होती. त्यात ज्यांना इशारा मिळाला होता, त्यापैकी चार जणांची हकालपट्टी झाली, हेही पुरेसे सूचक मानले जाते. आपापले नाव प्रसिद्धिमाध्यमांत रेटणाऱ्यांऐवजी गेला आठवडाभर बिलकूल शांत बसलेले प्रकाश जावडेकर यांना एकट्यालाच कॅबिनेटपदी बढती मिळाली आहे. आजच्या विस्तारात निवडणुकांचा विचार अर्थातच आहे. पुढील वर्षी निवडणुका होणाऱ्या उत्तर प्रदेश व राजस्थानला प्रत्येकी तीन-तीन, तर कर्नाटक व उत्तराखंडला एकेक मंत्रिपद मिळाले आहे. मात्र अलीकडेच स्वराज्यात झटका बसलेल्या मोदी-शहा यांनी गुजरातेतील दोघांना संधी दिली आहे.

जेथे निवडणुका नाहीत त्या मध्य प्रदेशासारख्या राज्यातूनही चार जण मंत्री झाले आहेत. यातील जावडेकर व "कॅश फॉर व्होट‘ फेम फग्गनसिंह कुलस्ते वगळले, तर दवे व अकबर हे राजकीय नेते म्हणून ओळखले जात नाहीत. नर्मदा परिक्रमा व शिवाजी महाराजांचा गाढा अभ्यास ही दवेंची, तर पत्रकारिता-प्रशासनातील दबदबा ही अकबर यांची वैशिष्ट्ये आहेत. अलीकडे रियल इस्टेटसारखी महत्त्वाची विधेयके राज्यसभेतून तारून नेण्यात दवे यांची फार मोठी मदत झाली होती. लोकसभेत नोटांची बॅग रिकामी करणारे व वर स्वतःच्या नावाची चिठ्ठी पत्रकारांपर्यंत पोचविणारे कुलस्ते हे धडपडे भाजप नेते आहेत. डॉ. सुभाष भामरे हे कर्करोगतज्ज्ञ आहेत व त्याच माध्यमातून ते मोदी यांच्या जवळ गेल्याची माहिती आहे. उत्तर प्रदेशातील अनुप्रिया पटेल यांच्या रूपाने कुर्मी मतपेढी, कर्नाटकातील रमेश चंदप्पा व महाराष्ट्रातील आठवले हे दलित नेते असल्याने मंत्री झाले आहेत. 

काम हीच शक्ती ठरेल 
मोदी यांनी नव्या मंत्र्यांना आज दुपारी चहापानासाठी बोलावले होते. त्या वेळीही त्यांनी तुमचे काम हीच तुमची सर्वांत मोठी शक्ती ठरेल, असा संदेश दिला. मोदी यांनी मंत्र्यांना मन लावून काम शिकण्याचा व नंतरच हारतुरे स्वीकारण्याचा सल्ला दिला. पंतप्रधान झाल्यावर मी चार महिन्यांतच काम शिकून घेतले होते, असा स्वानुभवही त्यांनी सांगितला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com