Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

लेखकांनी विवेक बाळगला पाहिजे - डॉ. रणसुभे
- सकाळ वृत्तसेवा
Tuesday, January 24, 2012 AT 01:00 AM (IST)
अंबाजोगाई - लेखकांनी लेखन करण्यापूर्वी गृहपाठ करणे आवश्‍यक असते. त्यांनी आपल्या लेखणात तारतम्य व विवेक बाळगला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. सूर्यनारायण रणसुभे यांनी येथे केले.

येथील सत्कार समितीच्या वतीने शनिवारी (ता.21) ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ तिवारी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी नगराध्यक्षा रचना मोदी, उपनगराध्यक्ष राजकिशोर मोदी, योगेश्‍वरी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ऍड. शिवाजीराव कराड, सत्कार समितीचे निमंत्रक प्रा. नानासाहेब गाठाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. रणसुभे म्हणाले, की प्रा. रंगनाथ तिवारी यांचे व्यक्‍तिमत्त्व अथांग कल्पनाशक्‍ती असणारे आहे. रसिकतेने जगण्याचा त्यांचा स्वभाव असून संगीत व प्राचीन वस्तूंबद्दल त्यांना प्रेम आहे. त्यांच्या कल्पनाशक्‍तीबद्दलचे काही किस्सेही डॉ. रणसुभे यांनी सांगितले. लेखक कसा असावा या बद्दल बोलताना ते म्हणाले, की लेखकांनी वास्तव विसरून चालत नाही. त्यांना आपल्या कल्पनेतून वेगळे विश्‍व निर्माण करता आले पाहिजे.

प्रा. रंगनाथ तिवारी यांनी आपल्या जीवनातील अनेक आठवणींना उजाळा देत रचनात्मक साहित्य निर्माण होण्याची गरज व्यक्‍त केली. या रचनात्मक साहित्यातूनच मानवी जीवनाला नवी दिशा मिळावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्‍त केली. सत्यम- शिवम्‌- सुंदरमची प्रतिष्ठा करणे हे रचनात्मक साहित्याचे अंतिम उद्दिष्ट असते, असेही त्यांनी सांगितले. अंधारातून बाहेर येण्यासाठी नवी वाट मिळावी यासाठी हा सत्कार उपयोगी ठरेल असे भावोद्‌गारही त्यांनी काढले.

या वेळी नगराध्यक्षा रचना मोदी, राजकिशोर मोदी व ऍड. शिवाजीराव कराड यांचीही भाषणे झाली. प्रा. तिवारी यांचा सत्कार शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन करण्यात आला. "विवेकसिंधू'च्या वतीने काढण्यात आलेल्या "प्रा. रंगनाथ तिवारी गौरव विशेषांकाचे' प्रकाशन नगराध्यक्षा रचना मोदी यांच्या हस्ते झाले. प्रा.तिवारी लिखित "सृजनविमर्श' या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. रणसुभे यांच्या हस्ते झाले. आद्यकवी मुकुंदराज कविता ग्रंथालयाच्या हस्तपुस्तिकेचे प्रकाशन श्री. मोदी यांच्या हस्ते झाले.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: