Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

कमळ @ 122
-
Saturday, January 28, 2012 AT 03:45 AM (IST)
नागपूर - नागपूर महापालिकेत भाजप, शिवसेना आणि आरपीआय (आठवले) यांच्या महायुतीची अधिकृत घोषणा शुक्रवारी करण्यात आली. भाजप 122, शिवसेना 18 आणि आरपीआय पाच जागांवर लढणार आहे. महापालिकेत महायुतीचा झेंडा फडकेल, असा दावा आमदार देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शेखर सावरबांधे यांनी केला आहे आणि आरपीआयचे राष्ट्रीय महासचिव भूपेश थुलकर यांनी संयुक्त पत्रकारपरिषदेत केला.

मुंबई महापालिकेसह सर्वच प्रमुख शहरांमध्ये महायुती करण्यात आली आहे. प्रचारसाहित्य आणि प्रचारसुद्धा एकत्रितच केला जाणार आहे. जागावाटपावरून युतीमध्ये कुठलेही मतभेद नाही. तीन पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जागा निश्‍चित करण्यात आल्या. शिवशक्ती आणि भीमशक्तीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येकाच्या मनातील ही युती असल्याचे सांगण्यात येत आहे. महायुतील मजबुतीची तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी मजबुरीची असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

पाच वर्षांच्या कार्यकाळात भाजप-सेना युतीने केलेल्या कामांचा लेखाजोखा लोकांच्या घरात पोचवला जाणार आहे. जाहीरनामा किती पूर्ण केला, हे जनतेसमोर ठेवला जाणार आहे. शंभर टक्के वचननामा पूर्ण झाला नसला तरी त्या दिशेने सकारात्मक वाटचाल सुरू केली आहे. आगामी पाच वर्षांत काय करणार याचाही संकल्प जाहीर केला जाईल, असे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पत्रपरिषदेला भूपेश थुलकर, शेखर सावरबांधे यांच्यासह भाजपचे शहराध्यक्ष अनिल सोले, आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, सुधाकर देशमुख, महापौर अर्चना डेहनकर, आरपीआयचे राजू बहादुरे उपस्थित होते.

आरपीआयला आणखी दोन जागा हव्यात
महायुतीमध्ये आरपीआयला पाच जागा देण्याची घोषणा करण्यात आली. असे असले तरी आरपीआयला दोन जागा वाढवून पाहिजे आहेत. याकरिता चर्चा सुरू आहे. प्रयत्न केले जात आहे. मात्र, दोन जागेसाठी महायुती तोडली जाणार नाही, असेही भूपेश थुलकर यांनी सांगितले.

जिल्हाप्रमुख म्हणून असमाधानी - सावरबांधे
जिल्हाप्रमुख म्हणून 18 जागेवर आपण समाधानी नाही. मात्र, महायुती करायची होती. याकरिता काही तडजोड करणे आवश्‍यक होते. निवडणूक लढण्यास मोठ्याप्रमाणात कार्यकर्ते उत्सुक आहेत; परंतु प्रत्येकाला उमेदवारी देणे शक्‍य नाही. कार्यकर्त्यांचे मेरिट आणि शिवसेनेची ताकद बघून 18 जागा निश्‍चित करण्यात आल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शेखर सावरबांधे यांनी सांगितले.

मैत्रिपूर्ण लढती नाहीत
भाजप आणि शिवसेनेने मागच्या निवडणुकीत युती केली होती. यानंतरही काही जागांवर मैत्रिपूर्ण लढती झाल्या होत्या. यावेळीसुद्धा काही जागांवर मैत्रिपूर्ण लढती होतील काय, या प्रश्‍नावर नेत्यांनी नकार दिला. महायुती करताना मैत्रिपूर्ण लढती करायच्या नाही, असा निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले. प्रभागपद्दतीने निवडणूक असल्याने बंडखोरी आणि मैत्रिपूर्ण लढती शक्‍य नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: