Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

चौघांच्या अपहरणप्रकरणी तिघांना अटक
- सकाळ वृत्तसेवा
Saturday, January 28, 2012 AT 11:45 PM (IST)
सातारा - जमिनीच्या व्यवहारातून अपहरण करून चौघांना साताऱ्यात दोन दिवस डांबून बेदम मारहाण करण्यात आली. नंतर बळजबरीने जमिनीचे खरेदीपत्र करून घेऊन सोडून देण्यात आले. शहर पोलिसांनी याप्रकरणी कऱ्हाड तालुक्‍यातील शहापूर येथील एका पोलिस अधिकाऱ्यासह दहा ते 12 जणांवर अपहरण करून मारहाण करणे व दरोडा घालणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

संजीवन नाथा कांबळे, सुनील नाथा कांबळे, संदीप नाथा कांबळे, विष्णू नाथा कांबळे (सर्व रा. शहापूर, कऱ्हाड), शिवाजी गणपत यादव ऊर्फ नाना फौजी (रा. अतीत, सातारा) यांच्यासह दहा ते 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यातील सुनील (वय 45), संदीप (वय 41) व नाना फौजी (वय 45) यांना अटक झाली आहे. संजीवन कांबळे हा मुंबई पोलिस दलात अधिकारी असल्याचे समजते. संशयितांनी गुंडांमार्फत अपहरण करून मारहाण केल्यामुळे जगन्नाथ रामचंद्र भोसले (वय 60), त्यांचा मुलगा योगेश भोसले (दोघेही रा. खोडशी, कऱ्हाड), कृष्णात नारायण ताटे (रा. बेलवडे, कऱ्हाड) व राजकुमार घारे (रा. घारेवाडी, कऱ्हाड) या जखमींवर क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगन्नाथ भोसले यांची हणबरवाडी व वाण्याचीवाडी (ता. कऱ्हाड) येथे 33 एकर 20 गुंठे बागायत जमीन आहे. ही जमीन 70 लाख रुपयांना खरेदी करण्याचा तोंडी व्यवहार कांबळे बंधूंनी श्री. भोसले यांच्याबरोबर 23 फेब्रुवारी 2003 मध्ये केला होता. इसारा म्हणून 15 लाख रुपये देण्याचे ठरले. तथापि, प्रत्यक्ष एक लाख रुपये भोसले यांना मिळाले. जानेवारी 2005 पर्यंत आणखी काही लाख रुपये त्यांनी भोसले यांना दिले. या वेळी दोघांत साठेखत करून तीन महिन्यांत उर्वरित रक्कम देऊन खरेदीपत्र करण्याचे ठरवले. मात्र, कांबळे बंधूंनी नंतर व्यवहार पूर्ण केला नाही. भोसले यांनी वकिलामार्फत नोटीस पाठवूनही त्यांनी दखल घेतली नाही. त्यामध्ये गेल्या सात- आठ महिन्यांपासून जगन्नाथ भोसले यांनी दुसरीकडे व्यवहार करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या.

याचा सुगावा लागताच गेल्या बुधवारी (ता. 25) सायंकाळी नाना फौजी याने भोसले यांच्या घरी जाऊन माझ्याकडे तुमच्या जमिनीसाठी पार्टी आहे. उद्या याबाबत बोलणी करण्यासाठी सातारला एका हॉटेलमध्ये या, असा निरोप दिला. त्याप्रमाणे जगन्नाथ भोसले, त्यांचा मुलगा योगेश, तसेच कृष्णात ताटे व राजकुमार घारे हे चौघे ताटे यांच्या मोटारीतून गुरुवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास साताऱ्यात महामार्गाजवळील ठरलेल्या हॉटेलवर गेले. तेथे भेटलेली अनोळखी व्यक्ती "तुमचे खरेदीखत करायचे आहे. इसारा रक्कमही देतो. तथापि, सर्च रिपोर्टसाठी दोघे जण माझ्याबरोबर वकिलाकडे चला,' असे म्हणाली.

श्री. भोसले व घारे यांना सदरबझारमध्ये एका खोलीत नेण्यात आले. त्या ठिकाणी "कांबळेंशी जमिनीचा व्यवहार पूर्ण करा,' असे दमटावून सात ते आठ जणांनी लाथा- बुक्‍क्‍या, तसेच दांडक्‍याने बेदम मारहाण केली. योगेश व ताटे यांनाही नेऊन चौघांनाही दिवसभर मारहाण करण्यात आली. कांबळेंशी व्यवहार न केल्यास योगेशला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. दुसऱ्या दिवशी, म्हणजे काल सकाळी नाइलाजाने जगन्नाथ भोसले यांनी व्यवहार करण्यास होकार दिला. भोसले यांना एका गाडीत घालून उंब्रजच्या उपनिबंधक कार्यालयात नेण्यात आले. त्यांच्या सह्या व अंगठे घेऊन एक पैसाही न देता कांबळे कुटुंबीयांच्या नावावर सर्व जमीन करून घेण्यात आली. खरेदीपत्र झाल्यानंतर सायंकाळी जगन्नाथ भोसले यांना तेथेच सोडून संशयितांनी पोबारा केला.

दरम्यान, इकडे सदरबझारमधील खोलीतील उर्वरित तिघांना एका मोटारीत बसवून काल रात्रीच दहिवडीजवळ निर्जनस्थळी सोडून देण्यात आले. जगन्नाथ भोसले यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपहरण करून मारहाण करणे, तसेच मोबाईल व मारुती मोटार काढून घेऊन दरोडा टाकणे आदी कलमांखाली संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दयानंद ढोमे अधिक तपास करत आहेत.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: