पेन्सिलच्या टोकावर 'आयुष्य' चितारणारा मुकेश!
-
Saturday, January 28, 2012 AT 04:00 AM (IST)
नागपूर - आकर्षक रंग आणि कुंचल्यांच्या आधारावर चित्र साकारणारे त्याचे आदर्श असले तरीही त्याने मात्र दहा वर्षांमध्ये एकदाही रंगांशी न खेळता एक आगळावेगळा चित्रकार म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. पाच रुपयांच्या पेन्सिलचा आधार घेऊन आपल्या नजरेला भावलेले "आयुष्य' चितारणारा...आणि याच पेन्सिलच्या टोकावरून कधी चेहरे तर कल्पनांचे मनोरे कॅनव्हासवर उतरविणारा हा चित्रकार...मुकेश चामोर्शीकर.
ब्रह्मपुरी येथील हा कलावंत सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत आपले किराण्याचे दुकान सांभाळतो आणि त्यातून जसा आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पेन्सिल हातात घेतो. प्रत्येकाला लहानपणी सुरवातीला पेन्सिलचे आकर्षण असते, पुढे पेनचे आणि चित्रांमध्ये मन रमले तर "पेंट ब्रश'चे आकर्षण. अशात पेन्सिल कधी मागे पडली आपल्याला कळतही नाही. मुकेशच्याही आयुष्यात वेगळे काही घडले नाही; पण कुंचल्यांच्या मोहात पूर्णपणे पडण्यापूर्वी त्याने मागे पडलेली पेन्सिल हाती घेतली आणि त्यातूच चित्रे साकारायला सुरवात केली. दहा वर्षांपूर्वी कार्टून्स आणि छोटे-मोठे पेन्टिंग्ज मुकेश काढायचा; पण एकदा पेन्सिल आर्टचे एक छोटेसे पुस्तक त्याच्या हाती पडले आणि तेथून पुढे आपल्या प्रत्येक कल्पनेला त्याने पेन्सिलची जोड दिली. एक चित्र कागदावर उतरविण्यासाठी किती खर्च येतो, असा प्रश्न मुकेशला केला तर त्याचे उत्तर तो "पाच रुपये' असे देतो. त्याला फ्रेम करणे आणि आकर्षक स्वरूपात रसिकांपुढे आणण्यासाठी मात्र पैसे मोजावेच लागतात. दहा वर्षांपासून सातत्याने पेन्सिल आर्ट करणाऱ्या मुकेशच्या चित्रांची आजवर तीन प्रदर्शने झाली आहेत. दोन ब्रह्मपुरीत आणि एक नागपुरात. दोन वर्षांपूर्वी आपल्या अफलातून कलेने नागपूरकरांना मोहिनी घालणारा मुकेश पुन्हा एकदा जुन्या-नव्या कलाकृतींसह उपराजधानीत आलाय. कुठलेही प्रशिक्षण किंवा "सो कॉल्ड कोचिंग' न घेतलेल्या मुकेशने केवळ स्वतःच्या इच्छाशक्तीवर आपले आगळे विश्व उभे केले आहे. व्यक्तिचित्र साकारण्यावर मुकेशचा विशेष जोर आहे; पण साध्या पेन्सिलीच्या जोरावर सर्व प्रकारच्या चित्रांवर मुकेशने आपला हातखंडा असल्याचे सिद्ध केला आहे. मुकेशच्या घरी आई-वडील आणि दोन भाऊ आहेत. दुकान आणि घरची जबाबदारी सांभाळून पेन्सिलच्या विश्वात रमणाऱ्या मुकेशचा त्यांनाही अभिमान वाटतो. सुनील शेट्टी, धनराज पिल्ले या "स्टार' मंडळींना त्यांचे "पोर्ट्रेट' मुकेशने स्वतःच्या हाताने भेट दिले आहेत, हे विशेष! आपल्यातील कला आणि तिच्याप्रति असलेले समर्पण मुकेशला मान्य असले तरीही फार गवगवा न करता काम सुरू ठेवणे यावर त्याचा विश्वास आहे. स्वभाव शांत असला तरीही एखाद्या छानशा कलाकृतीसाठी मुकेशचा कॅनव्हास कायम आतुर असल्याची चाहूल लागते, हेच त्याच्या समर्पणाचे प्रतीक होय!
आजपासून प्रदर्शन
मुकेशच्या "पेन्सिल स्केच'चे प्रदर्शन उद्यापासून (शनिवार) अंबाझरी येथील रवद्रनाथ टागोर आर्ट गॅलरी येथे सुरू होत आहे. उद्या सकाळी 11 वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन आहे. वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी हे अध्यक्ष असतील. सामाजिक कार्यकर्ते डॉ. पिनाक दंदे हे उद्घाटक आहेत तर महेश बंग यांची प्रमुख उपस्थिती असेल. टागोर आर्ट गॅलरीत 30 जानेवारीपर्यंत (सोमवार) सकाळी 11 ते रात्री 8 या कालावधीत रसिकांसाठी प्रदर्शन खुले असेल. अधिक माहितीसाठी 9422537471 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.