Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

विदर्भातील 30 शिक्षकांना राज्य पुरस्कार जाहीर
-
Saturday, January 28, 2012 AT 03:30 AM (IST)
हरसूल (जि. यवतमाळ) - राज्य शासनातर्फे दरवर्षी देण्यात येणारे राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात विदर्भातील 30 शिक्षकांचा
समावेश आहे. 11 प्राथमिक, 11 माध्यमिक, सात पुरस्कार आदिवासी भागात कार्यरत, कला व क्रीडाक्षेत्रातील शिक्षकाला एक, असे एकूण 30 पुरस्कार जाहीर झाले आहेत.

उत्कृष्ट शैक्षणिक कार्य करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी राज्य शासनाच्या शिक्षण विभागातर्फे पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. 2011-12 या शैक्षणिक वर्षाच्या जाहीर झालेल्या पुरस्कारांमध्ये राज्यभरातील 96 शिक्षकांना राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात 37 प्राथमिक, 38 माध्यमिक, आदिवासी श्रेत्रात कार्यरत 18, तर विशेष कला व क्रीडाशिक्षक दोन आणि अपंग एक असे 96 पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. दरवर्षी शिक्षकदिनी म्हणजेच पाच सप्टेंबरला या पुरस्काराचे वितरण करण्यात येते. दहा हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. राज्य शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाढी देण्यात येतात.

विदर्भातील पुरस्कारप्राप्त 11 प्राथमिक शिक्षकांमध्ये पुंडलिक उबाळे (लाख, जि. यवतमाळ), ख्वाजा साकिबुद्दीन जहिरुद्दीन (अकोट, जि. अकोला), सुनील उपाध्ये (उंबर्डाबाजार, जि. वाशीम), संजय पवार हिवरा (बुलडाणा), जावेद खान इक्‍बाल खान (वलगाव, जि. अमरावती), रेखा नागोरी कोरची (गडचिरोली), वंदना येनूरकर (नराळा, जि. वर्धा), अंकुश हलमारे (खापा, जि. भंडारा), रामराव मदनकर (वडगाव गुजर, जि. नागपूर), शरद उपलवार (ठाणा, जि. गोंदिया), डॅनिअल देशमुख (कांदेपार, जि. चंद्रपूर) यांचा समावेश आहे.

माध्यमिकच्या 11 शिक्षकांमध्ये डॉ. प्रकाश काळे (उमरखेड, जि. यवतमाळ), गजानन निमकर्डे (अकोट, जि. अकोला), रमेश वरघट, (कामरगाव, जि. वाशीम), दीपक ठक्कर (अमरावती), शिवाजी मस्के (जानेफळ, जि. बुलडाणा), श्‍याम निकोसे (नागपूर), प्रदीप गौतम (वर्धा), हरिभाऊ पाथोडे, (सिंदेवाही, जि. चंद्रपूर), नाना ठाकूर (घोट, जि. गडचिरोली), लहू काटेखाये (सावर्ला, जि. भंडारा), गिरिधारीलाल कऱ्हाडे (गोरेगाव, जि. गोंदिया) यांचा समावेश आहे.
आदिवासी भागातील सात शिक्षकांमध्ये अरुणा मेश्राम (केळापूर, जि. यवतमाळ), दीपक महल्ले (टेंब्रुसोंडा, जि. अमरावती), अलका मुळे (चोखाळा, जि. नागपूर), क्रिष्णा गभणे (शिरपूर, जि. गोंदिया), दीपक माडूरवार (वरोरा, जि. चंद्रपूर), सुधाकर येरडुके (रामपूर, जि. चंद्रपूर), देवनाथ म्हशाखेत्री (विरूर, जि. गडचिरोली) यांचा समावेश आहे. कला आणि क्रीडाक्षेत्रातून अमोलकचंद महाविद्यालय यवतमाळचे क्रीडाशिक्षक प्लोरा गुरुविंदरसिंग यांची राज्य पुरस्कारासाठी निवड झाली आहे. विदर्भातून यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यांतून प्रत्येकी चार, अमरावती, नागपूर, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यांतून प्रत्येकी तीन, तर अकोला, वाशीम, बुलडाणा, गोंदिया, वर्धा, भंडारा या जिल्ह्यांतून प्रत्येकी दोन शिक्षकांचा समावेश आहे.

अजूनही वेतनवाढ नाही
2006-2007 पासून पुरस्कारप्राप्त शिक्षकांना दोन वेतनवाढ मिळाली नाही. 2006-2007 व 2007-2008 या वर्षात वेतनवाढ लागू करण्यात आली होती. मात्र, सहावा वेतन आयोग 2008 मध्ये लागू झाल्यानंतर या जादा वेतनवाढीचा दिलेला लाभ परत घेण्यात आला. गेल्या पाच वर्षांतील सहाशेवर शिक्षक अजूनही वेतनवाढीपासून वंचित असताना या नव्या 96 शिक्षकांची त्यात भर पडली आहे.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: