Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

'काडीमोड'नंतर शिवसेनेचे 'आता होऊनच जाऊ द्या...!'
-
Saturday, January 28, 2012 AT 03:00 AM (IST)
नाशिक - महापालिका निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती होणार नसल्याचे भारतीय जनता पक्षाकडून जाहीर झाल्यानंतर शिवसेनेनेही सर्वच्या सर्व 122 जागांवर उमेदवार लढविण्याचे निश्‍चित केले असून, रिपब्लिकन पक्षाला (आठवले गट) काही जागा सोडून शिवसेना निवडणूक लढविणार आहे. "आता होऊनच जाऊ द्या' असे आव्हान शिवसेनेने भाजपला दिले आहे. दरम्यान, भाजपकडूनही सर्व जागांवर उमेदवारी निश्‍चित करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

गेल्या वीस वर्षांपासून हातात हात घालून राजकीय संसार थाटलेल्या भाजप-शिवसेना युतीने अखेर काडीमोड घेण्याचा निर्णय जाहीर केल्याने प्रत्येक प्रभागात आता चौरंगी ते पंचरंगी लढती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काल (ता. 26) दुपारपर्यंत भाजपच्या नेत्यांची प्रदेश कार्यालयात बैठक झाली. त्या वेळी स्थानिक नेत्यांनी शिवसेनेशी युती न करता शहरात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी स्वतंत्र निवडणूक लढवावी, असे मत व्यक्त केले. वीस वर्षांपासून युती असूनही भाजपच्या पदरी फारसे काही पडलेले नाही. बाळासाहेब सानप यांना एकदा महापौरपद, तर मागील पंचवार्षिकमध्ये प्रा. देवयानी फरांदे यांच्या रूपाने उपमहापौरपद मिळाले. 2002 मध्ये महापालिकेत युतीची सत्ता आल्यानंतर विजय साने यांना स्थायी समितीचे सभापतिपद मिळाले. मागील पंचवार्षिकमध्ये भाजपला एकदा महापौरपद मिळणे अपेक्षित होते; परंतु तसे झाले नाही. अपक्षांचा टेकू घेऊन सत्ता हस्तगत केली. पहिल्या टर्ममध्ये विनायक पांडे यांना अपक्ष गटातून महापौरपद मिळाले असले, तरी पांडे शिवसेनेचेच आहेत. नागरिकांमध्येही हाच संदेश पोचल्याने भाजपचे अस्तित्व दिसले नाही. दुसऱ्या टर्ममध्ये शिवसेनेच्या नयना घोलप यांना महापौरपदाची संधी मिळाली. अजय बोरस्ते यांना भाजपच्या कोट्यातून उपमहापौरपद मिळाले असले, तरी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने त्यांना शिवसेनेचेच उपमहापौर म्हणून नागरिकांनी ओळखले. यासारख्या तक्रारी वरिष्ठांकडे मांडण्यात आल्याने त्यांचे मन वळविण्यात स्थानिक नेत्यांना यश आले. तत्पूर्वी बुधवारी (ता. 25) झालेल्या चर्चेत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून युतीबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला; परंतु भाजपच्या स्थानिक नेत्यांनी पक्षाच्या अस्तित्वाचाच प्रश्‍न निर्माण केल्याने वरिष्ठांनीही दखल घेत, अखेर युती तोडण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. युती तुटल्याची वार्ता शहरात पोचल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांकडूनही "आता होऊनच जाऊ द्या...', अशी भूमिका घेण्यात आली. त्यामुळे आता महापालिका निवडणुकीत चौरंगी ते पंचरंगी सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेने 122 जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला असून, रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाला काही जागा सोडून उर्वरित जागांवर भाजपसह आघाडीच्या उमेदवारांचा सामना करणार असल्याचे महानगरप्रमुख अर्जुन टिळे यांनी स्पष्ट केले.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: